नागपूर : गेल्या आठवड्यात नागपूरच्या रेशीमबागमध्ये आयोजित रामकथेची चर्चा जोरात सुरू आहे. बागेश्वर धामचे मुख्य पुजारी धीरेंद्र शास्त्रींनी 'रामकथेच्या नावाने' अंधश्रद्धेचा खेळ सुरू केला होता, असा आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. एवढेच नाही तर धीरेंद्र शास्त्रींनी किमान दहा लोकांवर चमत्कार सिद्ध केल्यास त्यांना ३० लाख देऊ, असे आव्हान देखील अंनिसकडून देण्यात आले आहे.
धर्मेंद्र शास्त्रींवर आरोप : मध्यप्रदेशच्या छतरपूर येथील बागेश्वर धाम आणि धीरेंद्र कृष्ण शास्त्रीच्या नावाची केवळ भारतातच नाही तर जगभरात मोठी चर्चा आहे. बागेश्वर धामचे मुख्य पुजारी धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांचा दरबार गेल्या आठवड्यात नागपुरच्या रेशीमबाग मैदानावर भरला होता. धीरेंद्र शास्त्री यांचे दर्शन घेण्यासाठी आणि रामकथा ऐकण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोक आले होते. रामकथेच्या नावाने धीरेंद्र शास्त्री यांनी जादूटोणा आणि अंधश्रद्धा पसरवण्याचे काम केल्याचा आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख श्याम मानव यांनी केला आहे.
धीरेंद्र कृष्ण शास्त्रींना 'अंनिस'चे आव्हान : 'दिव्य दरबार' आणि 'प्रेत दरबार'च्या नावाखाली जादूटोण्याला प्रोत्साहन दिले जात आहे. या शिवाय देव-धर्माच्या नावा सर्वसामान्यांची लूट, फसवणूक,पिळवणूक होत असून महाराजांवर कारवाई करण्याची मागणीही समितीने पोलिसांकडे केली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी धीरेंद्र कृष्ण शास्त्रींना आव्हान दिले आहे. त्यांनी आमच्यामध्ये दैवी चमत्कारी दरबार आयोजित करावा, सर्व सत्य सांगाल तर आम्ही त्यांना 30 लाख रुपये भेट देऊ, असे अंनिसकडून आव्हान देण्यात आले आहे.
नागपुरातुन काढला पळ : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आवाहन स्वीकार न करता धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी नागपुरातून पळ काढल्याचा आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून करण्यात आला आहे.
रामकथेला मंत्र्यांची उपस्थिती : बागेश्वर धामचे मुख्य पुजारी धीरेंद्र शास्त्रींच्या 'रामकथेला भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांनी हजेरी लावली. यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा देखील समावेश आहे. तसेच रामकथेच्या दरम्यान काही भाजप नेते देखील उपस्थित होते.
धीरेंद्रकृष्ण शास्त्रींचे प्रत्युत्तर : पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी या वादवर आपली प्रतिक्रिया दिली आहे, ते म्हणाले आहे की गेल्या सात दिवसांपासून ते नागपुरात राम कथा आयोजित होती. त्यादरम्यान कोणीही आव्हान दिले नाही. मात्र कथेवरून परत येताच सनातन धर्माच्या विरोधकांनी अपप्रचार सुरू केला आहे,त्यांच्यावर झालेल्या आरोपावर सुद्धा त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'हाथी चले बाजार कुत्रा भोंके हजार' असे उत्तर दिले आहे.