नागपूर - महाराष्ट्रात सध्या सरकारला अस्थिर करण्याचे काम सुरू आहे. राष्ट्रपती राजवट लावून भारतीय जनता पार्टीचे सरकार आणण्याचे राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे. धर्मा-धर्मात तेढ निर्माण करण्याचे दुर्दैवी काम महाराष्ट्र्रात सध्या सुरु असल्याचेही मत व्यक्त करत रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी भाजपावर टीका केली.
उद्योगधंदे गुजरातकडे पळवले - आज महाराष्ट्र हा आर्थिक दृष्ट्या मागे पडत आहे. नवीन उद्योगधंदे महाराष्ट्रात यायला तयार नाहीत. महाराष्ट्रातील औद्योगिक धंदे गुजरातमध्ये पळवले जात असल्याचाही आरोप आनंराज आंबेडकर यांनी केला. त्यामुळे महाराष्ट्र कुठेतरी मागे पडत आहे. महाराष्ट्रात जातीय दंगे निर्माण करण्याचे मनसुबे आहे, हे लोकांनी ओळखावे असेही आवाहन त्यांनी केले. राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज ठाकरे यांना सुपारीबाज म्हटले होते. मी काही बोलण्यापेक्षा माजी मुख्यमंत्री बोलले आहे त्याचाही विचार व्हावा असेही आनंदराज आंबेडकर म्हणाले.
ओबीसी जनतेने रस्त्यावर येण्याची गरज - सुप्रीम कोर्टाने ओबीसीचे राजकीय आरक्षण वगळून निवडणुका घेण्याच्या घोषणा केल्या आहेत. या सरकारने ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले पाहिजे होते ते झाले नाही. तसेच जे ट्रिपलटेस्ट पूर्ण करून सर्वोच्च न्यायालयाकडून सांगण्यात आले होते, तो डेटा पूर्ण करता आला नाही. त्यामुळे ओबीसीचे आरक्षण गेले आहे. यासाठी सरकारने आणखी प्रयत्न करावे असेही आनंदराज आंबेडकर म्हणाले. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने मागितलेला डेटा दिला तर ओबीसींना आरक्षण मिळू शकते तसेच ओबीसी समाजाने आपल्या लढाईसाठी रस्त्यावर आले पाहिजे आणि आपली मागणी लावून धरली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. ओबीसी समाज अजूनही जागृत झालेला नाही अशी ही नाराजी त्यांनी व्यक्त केल. कोव्हिडं नंतर जो सरकारला वेळ मिळाला होता त्यामध्ये तो डेटा एकत्र होणे गरजेचं होतं, मात्र दुर्दैवाने ते झाले नाही त्यामुळे ओबीसींनी जागृत होण्याची गरज आहे असेही ते म्हणाले.
स्मारकासाठी जागा नव्याने करावी अन्यथा आंदोलन करू - पटवर्धन मैदानावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक व्हावे असा ठराव पंचवीस वर्षांपूर्वी महानगर पालिका सभागृहात मांडण्यात आला होता. आणि तो मंजूर करण्यात आला होता. अत्यंत दुर्दैवी आहे कुठलेही पाऊल अद्याप उचलले नाही. त्यामुळे या सरकारला तीन महिन्याचा अल्टिमेटम देत आहो. ही जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी समितीच्या नावाने केली नाही तर रिपब्लिकन सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा दिला. या जागेशी आंबेडकरी जनतेचे भावनिक नातं जोडलेले आहे.
भोंग्याचा उत्तर भोंग देणं योग्य नाही - राज्यात भोंगवरून मोठ्या प्रमाणात वाद सुरू आहे. त्यामुळे या भोंग्याचा उपयोग वाद निर्माण करण्या ऐवजी बेरोजगारी महागाईवर बोलण्यासाठी समाजात जनजागृती करण्यासाठी भोंग्याचा उपयोग व्हावा, असेही आवाहन आनंदराज आंबेडकर यांनी केले. तसेच केंद्रात आलेल्या सरकारमुळे अनेकांवर यूएपीआय कायदा लाऊन लोकशाही विरोधी काम करत अघोषित आणीबाणीची परिस्थिती निर्माण केल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत असल्याचाही आरोप आनंदराज आंबेडकर यांनी केला.