नागपूर : स्मशानभूमीत सर्वत्र जिकडे-तिकडे अस्वच्छता, घाण आणि कुबट वासामुळे कोणाच्या जरी अंत्यसंस्काराला जाण्याची वेळ आल्यास भीतीचा काटा अंगावर उभा राहतो. मात्र, या सर्व परिस्थितील अपवाद ठरली आहे. अंबाझरी स्मशानभूमी पौराणिक कथेनुसार स्वर्ग आणि पृथ्वीच्या मधील स्वर्गद्वार म्हणून स्मशाभूमी आहे असे म्हटले जाते. त्यामुळे शेवटचा प्रवास हा सुंदर असावा उद्देशाने, इको फ्रेंडली लिव्हिंग फाउंडेशनच्या लोकांनी मेळघाट येथील बांबूचे साहित्य तयार करणाऱ्या काही कलाकारांच्या मदतीने अंबाझरी स्मशानभूमीचा कायापालट केला आहे.
स्मशानभूमीला गार्डनचे स्वरूप : स्मशानभूमी कोणतीही असू द्या तिथले वातावरण कायम नैराश्याने भरलेले, मनात एकप्रकारची भीती, त्यामुळे उदासीन वातावरणाचा गंध हा तिथल्या प्रत्येक वस्तूंमध्ये प्रकर्षाने जाणवतो. ही परिस्थिती सर्वच स्मशानभूमीत असते. इको फ्रेंडली लिव्हिंग फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून अंबाझरी स्मशानभूमीची संपूर्ण दशा व दिशा पूर्णपणे पालटली आहे. तिरडीच्या बांबूपासून स्मशानभूमीत आकर्षक सजावट केली आहे. त्यामुळे स्मशानभूमीला गार्डनचे स्वरूप आले आहे.
तिरडीच्या बांबूचा आधार : हिंदू मान्यतेनुसार अंत्यसंस्कारपूर्वी मयताची अंतयात्रा बांबूची तिरडी सजवून काढली जाते. स्मशानभूमीत गेल्यानंतर तिरडीवरील मृतदेह रचलेल्या लाकडी सरणावर ठेवल्यानंतर अनेक ठिकाणी तिरडी फेकून दिली जाते. याशिवाय आता तर डिझेल किंवा गॅस शव दहिणीत तर केवळ मृतदेह ठेवला जातो. त्यामुळे तिरडी ही स्मशानभूमीच्या परिसरातच फेकून दिली जाते. गेल्या काही महिन्यांत अंबाझरी स्मशानभूमीत मोठ्या प्रमाणात बांबू गोळा झाले होते. तिरडीचे बांबू कोणी उपयोगात आणत नाहीत. त्यामुळे इको फ्रेंडली लिव्हिंग फाउंडेशनच्या स्वयंसेवी कार्यकर्त्यांनी बराच विचार करून बांबू पासून बगिच्याची सुरक्षा भिंत आणि झाडांसाठी कठडे तयार करून घेतली आहेत. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी अंबाझरी स्मशानभूमीत येणाऱ्या लोकांना दुःखाचा विसर पडेल अशी या मागची भावना असल्याची माहिती, इको फ्रेंडली लिव्हिंग फाउंडेशनच्या विजय लिमये यांनी दिली आहे.
स्मशानभूमी अशी असू शकते का : अंबाझरी स्मशानभूमीत आल्यानंतर इथे प्रत्येक व्यक्तीला आपण एखाद्या बगीच्यात तर आलो नाही ना याचा भास होतो. स्मशानभूमीच्या आत जाणाऱ्या रस्त्यांच्या भोवताल तिरडीच्या बांबूचा वापर करून आकर्षक कंपाऊंड तयार केले आहे. एवढेच नाही तर त्याला आकर्षक रंग रंगीबेरंगी रंग देखील देण्यात आले आहेत. त्यामुळे स्मशानभूमीत आलेल्या लोकांना खरंच आपण स्मशान भूमीत आलो का? हा प्रश्न नक्की पडतो.
बांबू फेकू नाका, डोनेट करा : स्मशानभूमीत अंतिम संस्कारसाठी येणाऱ्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी मदतीचा एक हात पुढे करावा. तिरडीचे बांबू पेटवून किंवा फेकून न देता ते आम्हला द्या असे आवाहन इको फ्रेंडली लिव्हिंग फाउंडेशनकडून करण्यात आले आहे. भविष्यात नागपुरातील प्रत्येक स्मशानभूमीत हा प्रयोग करण्याचा त्यांचा मानस आहे.
हेही वाचा -