नागपूर: अभिषेख सिंह हा मकोकाचा आरोपी दीड वर्षांपासून फरार आहे. त्याच्यावर संघटित गुन्हेगारी आणि हत्यार कायद्याच्या अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे मकोका अंतर्गत सदर पोलीस स्टेशन अंतर्गत कारवाई केल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार (Commissioner of Police Amitesh Kumar) यांनी दिली आहे. पण त्याला राजाश्रय असल्याचा आरोपात तथ्य नसल्यासेही त्यांनी स्पष्टीकरण दिले. तसेच अश्या कुठल्याही प्रकरणात एखादा आरोपी आहे हे माहीत असतांना ती माहिती जाणीवपूर्वक लपून ठेवत असल्यास तो गुन्हा ठरतो. पण त्या व्यक्तीचा गुन्ह्या बद्दल माहिती नसल्यास तो गुन्हा ठरत नाही असेही पोलीस आयुक्त यांनी सांगितले आहे.
ज्वाला धोटे यांचे आरोप
राष्ट्रवादीच्या नेत्या ज्वाला धोटे यांनी मकोकाचा फरार आरोपी अभिषेख सिंह हा पोलिसांच्या रेकॉर्डवर फरार आहे. तो नोव्हेंबर 2020 पासून फरार असला तरी त्याची 2021 मध्ये ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या घरी ये जा आहे. राऊत यांचे सुपुत्र कुणाला राऊत यांनी प्लेनच्या तिकीट काढून त्याचसोबत प्रवास करत अनेक शहरात फिरल्याचाही आरोप त्यांनी केला. यासोबत काँग्रेसचे अनेक मोठया नेत्यासोबत तो वावरत असल्याचे फोटो पुरावा म्हणून माध्यमांना दिले. त्यामुळे या प्रकरणात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या मुंबईच्या शासकीय बंगल्यातील सीसीटीव्ही तपासावे असेही म्हंटले आहे.
पोलिसात तक्रार देणार ...
सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेनंतर अभिषेक सिंह प्रकरणात सदर पोलिसांना फरार आरोपीला राजाश्रय देत असल्याची तक्रार करून असलेले पुरावे देणार असल्याचेही राष्ट्रवादीच्या नागपूर अर्बन सेलच्या अध्यक्षा ज्वाला धोटे यांनी सांगितले.
राऊत कुटुंबियांची प्रतिक्रिया कळू शकली नाही...
या संदर्भात प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यावर ऊर्जामंत्री नितीन राऊत हे मुंबईला असल्याचे समजले. तेच मुलगा कुणाल राऊत यांच्याशी दुरध्वनीवर संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद न दिल्याने राऊत कुटुंबियांची या प्रकरणात प्रतिक्रिया कळू शकली नाही.