नागपूर : अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री आहेत. त्यामुळे कोणत्याही विभागाच्या बैठका घेऊन माहिती घेण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले आहेत.
भारतासाठी आनंदाचा क्षण : आज भारतासाठी आनंदाचा क्षण आहे. चंद्रयान 3 चे चंद्रावर लँडिंग होत आहे. भारतासाठी आज गौरवाचा, अभिमानाचा दिवस आहे. भारताची प्रतिभा किती शक्तिशाली आहे, हे आज सगळ्या जगाला दिसेल, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक केले आहे. ते आज नागपूर विमानतळावर बोलत होते.
कांदा खरेदीस मान्यता : कांद्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कांद्याचं उत्पन्न घेतलं जातं. सरकारने निर्यातदर वाढवला असून केंद्र सरकारने तब्बल २ लाख टन कांदा खरेदी करण्यास मान्यता दिली आहे. कांद्याला ऐतिहासिक भाव देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. गरज भासल्यास केंद्र सरकारने आणखी कांदा खरेदी करण्याची तयारी दर्शवली आहे, असे खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले आहेत.
वडेट्टीवारांच्या मनसुब्यावर पाणी फेरायचे नाही : मुख्यमंत्री खुर्चीवर डोळा असणाऱ्या सगळ्यांना खासदार प्रफुल्ल पटेल यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. आता कॉंग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांची प्रगती झाली आहे. ते जर सप्टेंबरमध्ये हे सरकार पडणार आहे असे म्हणत असतील तर त्यावर मला पाणी फेरायचे नाही. सगळ्यांना शुभेच्छा देत प्रफुल्ल पटेल यांनी टोला लावला आहे. महायुतीमध्ये तिन्ही घटक पक्षात चांगला समन्वय आहे. प्रत्येक गोष्टीवर एकमेकांशी संवाद करून आम्ही निर्णय घेत असतो. यात उगाच वादावादी लावायचा कोणी प्रयत्न करत असतील तर ते चुकीचे आहे. त्यात तथ्य नाही, असे देखील प्रफुल्ल पटेल म्हणाले आहेत.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा अविभाज्य भाग : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) नेते प्रफुल्ल पटेल हे यापूर्वी पाटणा येथे गेल्या महिन्यात झालेल्या विरोधकांच्या बैठकीला उपस्थित होते. ते मंगळवारी दिल्लीतील एनडीएच्या बैठकीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा अविभाज्य भाग आहे. त्यांचा पक्ष भविष्यात एनडीएसोबत काम करेल, असे ते म्हणाले. एनडीएच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त 38 राजकीय पक्ष उपस्थित होते. आमच्या बाजूने अजित पवार यांनी बैठकीत आपले विचार मांडले, असे अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.
हेही वाचा:
- MLAs Disqualification Hearing :आमदार अपात्रतेच्या सुनावणीसाठी दिरंगाई होणार नाही; योग्य निर्णय घेणार - राहुल नार्वेकर
- Raj Thackeray little Fan : राज ठाकरेंनी दुर्धर आजारग्रस्त चिमुकल्याची 'ती' इच्छा केली पूर्ण; पाहा व्हिडिओ
- Talathi Recruitment : तलाठी भरतीतील गैरप्रकाराची चौकशी 'एसआयटी' मार्फत करा - जयंत पाटील