नागपूर - कोझिकोड येथे झालेल्या विमान दुर्घटनेत माजी विंग कमांडर आणि एअर इंडियाचे पायलट दीपक साठे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांचे आई-वडिल हे नागपूरात राहत आहेत. आपला मुलगा देशाला समर्पित झाल्याचा मला सार्थ अभिमान आहे, अशी भावना दिपक साठे यांच्या आई निलाबाई साठे यांनी व्यक्त केली.
दीपक साठे हे मुळचे नागपूरचे होते. त्यांचे आई-वडिल अजूनही नागपूरमध्ये राहतात. त्यांना आज सकाळी विमान दुर्घटनेबाबत सांगण्यात आले. या घटनेबाबत आई वडिलांना कळताच 'माझा मुलगा देशसेवेसाठी समर्पित झाला ही मोठ्या भाग्याचे बाब आहे, अशी प्रतिक्रिया आई निलाबाई साठे यांनी दिली. आजच दीपक साठे यांच्या आईंचा ८३ वा वाढदिवस देखील आहे. त्यामुळे त्यांच्या वाढदिवसाला मुलाच्या जाण्याने दुःखाची किनार आहे. दीपक साठे यांची चुलत भावंडे देखील नागपूरातच राहतात. दीपक साठे हे गेल्या ११ मार्चला नागपूरात आले होते. त्यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत काही वेळ घालवला होता.
माझा मुलगा हा अगोदरपासून खूप हुशार व कर्तृत्ववान, सगळीकडे मेडल मिळवणारा होता. आजवर तो देशाच्या गौरवाचा भाग राहिला. तो अतिशय चांगला मुलगा होता. कोरोनाच्या काळतही आमची आवर्जून काळजी घेत होता, असे साठे यांच्या आईने सांगितले.
दीपक साठे यांना ३६ वर्षांचा अनुभव होता. २००५मध्ये त्यांनी एअर इंडियामध्ये नोकरी स्विकारली होती. त्या अगोदर २१ वर्षे त्यांनी भारतीय वायू दलात विंग कमांडर म्हणून सेवा दिली होती. एनडीएच्या पासिंग आऊट परेडमध्ये त्यांनी 'स्वॉर्ड ऑफ ऑनर'ही मिळवले होते.