नागपूर - नागपूर महामेट्रोकडून भरती प्रक्रियेत बहुजन समाजाच्या युवकांना डावलून अन्याय केल्याचा आरोप करत युवक कॉंग्रेसककडून आज युवक काँग्रेसच्या महासचिव शिवानी वडेट्टीवार यांच्या नेतृत्त्वात दीक्षा भूमी मार्गावरील महामेट्रोच्या गेटसमोर बसून आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवानी वडेट्टीवार यांनी मोदी सरकारने मेट्रोभरतीत बहुजन समाजातील युवकांना डावलण्याचे काम केल्याचा आरोप केला.
भरती प्रक्रियेत घोळ असल्याचा आरोप -
एससी प्रवर्गात 132 पैकी 42 जागा भरल्या आहे. एसटी 44 पैकी 24 जागा, ओबीसीच्या 238 पैकी 113 इडब्ल्यूएस 88 पैकी 12 पण ओपन 357 असताना 690 जागा भरल्या असून (333) जागा अतिरिक्त भरल्याचा आरोप यावेळी युवक कॉंग्रेसच्यावतीने करण्यात आला.
'बहुजनांच्या युवकांना न्याय मिळाला पाहिजे' -
महामेट्रोने जागा आणि प्रत्यक्षात भरलेल्या जागा यात मोठी तफावत आहे. याबाबत आम्ही राज्य सरकारला निवेदन दिले आहे. राज्य सरकार त्यांच्या परीने प्रयत्न करत आहे. पण महाराष्ट्र सरकार असो की केंद्र सरकार असो बहुजनांना न्याय मिळाला पाहिजे. या जागा आरक्षणाप्रमाणे जागा भरावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच येत्या दोन दिवसांत आंदोलन अधिक तिव्र करणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
हेही वाचा - महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी भुजबळ दोषमुक्त, एसीबी न्यायालयाची क्लीनचीट