नागपूर - नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपती भवनात सलग दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. सोबतच नव्या मंत्रीमंडळाने देखील शपथ घेतली. नागपूर लोकसभा क्षेत्रातील खासदार नितीन गडकरी यांनी देखील आज एक कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. नितीन गडकरी ह्यांच्याकडे पूर्वीच्या मंत्रिमंडळात देखील कॅबिनेट मंत्रीपद सोपविण्यात आले होते. गडकरी यांची रोडकरी म्हणून संपूर्ण देशात ख्याती आहे. नितीन गडकरी यांच्या शपथविधीनंतर नागपुरातील भाजप कार्यकर्त्यांनी भाजप मुख्य कार्यालयासमोर जल्लोष केला.
यावेळी विधान परिषदेचे पदवीधर आमदार अनिल सोले व नागपूर मनपाचे सत्ताधारी पक्ष नेते संदीप जोशी याच्या उपस्थिती मध्ये जल्लोष करण्यात आला. भाजप कार्यकर्त्यांनी ढोल ताशावर ताल धरला तर महिला कार्यकर्त्यांनी त्यावर फुगडी देखील घातली. भाजप कार्यकर्यांसाठी हा विजयाचा दिवस असून नागपुरातील सुपुत्राची ही वाटचाल देशात नविन दिशादर्शक होईल अशी जल्लोष करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा होती.