नागपूर - आरोपींना शिक्षा देण्याचे काम पोलिसांचे नाही. त्यासाठी आपल्या देशात सक्षम न्यायव्यवस्था उपलब्ध असल्याचे मत अॅड. स्मिता सिंघलकर यांनी व्यक्त केले. हैदराबाद येथील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपींचा आज एन्काऊंटर करण्यात आला, याबाबत ते बोलत होते.
न्यायालयाच्या निकालाची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी पोलिसांनी त्या आरोपींचा एन्काऊंटर केला. त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा दिल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या. मात्र, याबाबत कायदेतज्ज्ञांचे मत वेगळे आहे. लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना शिक्षा होणे गरजेचे आहे. आरोपींना पकडणे हे पोलिसांचे काम आहे. मात्र, त्यांना शिक्षा देण्याचे काम न्यायालयाचे आहे. पोलिसांनी कायद्याची भीती निर्माण करून विकृती घालविण्याचे काम करायला पाहिजे. अशाप्रकारे एन्काऊंटर केल्याने विकृती जाणार नाही, असे अॅड. सिंघलकर म्हणाल्या. तसेच याप्रकरणात नेमके काय घडले ते तपासले जाईल आणि एन्काऊंटर का करावा लागला? हे सुद्धा कायद्याच्या दृष्टीने तपासण्यात येण्याची शक्यता आहे. या प्रकारामुळे समाजात चुकीचा संदेश जाण्याची शक्यता असल्याचे मत सिंघलकर यांनी व्यक्त केले.
हे वाचलं का? - #HyderabadEncounter: 'त्या' चौघांचा कर्दनकाळ ठरलेला 'एन्काऊंटर मॅन' आहे तरी कोण..