नागपूर- मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेनंतर आता शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे 'जन आशीर्वाद यात्रा' घेऊन नागपुरात दाखल होणार आहेत. यात्रे दरम्यान ते तरुणांशी संवाद साधणार आहेत. हिंगणा मतदारसंघात असलेल्या प्रियदर्शनी महाविद्यालयात जाऊन ते 'आदित्य संवाद' या कार्यक्रमाच्या माध्यमातून तरुणांसोबत चर्चा करून त्यांचे प्रश्न जाणून घेतील.
आदित्य यांच्या जन आशीर्वाद यात्रेचा तिसरा टप्पा हा मंगळवारी नागपूर येथून सुरू होत आहे. या यात्रेच्या माध्यमातून ते विदर्भातील जनतेकडे आशीर्वाद मागणार आहेत. २७ऑगस्ट रोजी आदित्य ठाकरे हे नागपुरातील तरुणांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर कळमेश्वर शिवसेनेतर्फे आयोजित विजय संकल्प मेळाव्यात ते नागरिकांशी चर्चा करण्याची शक्यता आहे. नागपूर शहरातील पश्चिम नागपूर या मतदार संघासाठी शिवसेना आग्रही आहे. तर युतीच्या काळात जिल्ह्यातील रामटेक आणि काटोल विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या कोट्यात असायचा. मात्र २०१४ मध्ये युती तुटल्यानंतर या दोन्ही मतदार संघात भाजपचे उमेदवार निवडून आल्याने आता हिंगणा आणि सावनेर या मतदार संघाकडे शिवसेनेचा डोळा असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळेच आदित्य ठाकरे यांची जन आशीर्वाद यात्रा हिंगणा आणि सावनेर मतदार संघातून जाणार आहे. नागपूर जिल्हयातून जन आशीर्वाद यात्रा संपवून आदित्य ठाकरे अमरावती जिल्ह्यातील नागरिकांचा आशीर्वाद घेणार आहेत. त्यानंतर वर्धा,यवतमाळ,वाशीम, अकोला आणि बुलढाणा जिल्यात यात्रा मार्गस्थ होणार आहे.