नागपूर - लग्नसमारंभादरम्यान वधू आणि वर पक्षातील मंडळींमध्ये 'डीजे' च्या गाण्यावरून झालेल्या वादात एका जणाची निर्घृण हत्या झाल्याची घटना कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. निखिल लोखंडे (वय २६) असे मृत तरुणाचे नाव असून पोलिसांनी निखिलच्या हत्येप्रकरणी वधू पक्षाकडच्या ५ वऱ्हाडींना ताब्यात घेतले आहे.
कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमन लॉन येथे गणेश नंदनवार यांच्या कुटुंबात लग्न समारंभ होते. या लग्न सोहळ्यात सर्व काही आनंदात सुरू असताना लग्नविधी आटोपल्यानंतर वधू-वर पक्षाचे नातेवाईक डीजेच्या तालावर नाचत होते. दरम्यान, डीजेच्या गाण्यावरून दोन्ही गटात वाद झाला, तेव्हा दोन्ही पक्षातील जेष्ठ मंडळींनी मध्यस्थी करून भांडण मिटवले होते. मात्र, रात्री उशिरा वर पक्षाचे काही तरुण धारधार हत्यार घेऊन आले आणि पुन्हा दोन गटात हाणामारी झाली. ज्यामध्ये निखिल लोखंडे नामक तरुण गंभीर जखमी झाला, निखिलला तत्काळ रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
हेही वाचा - 'नागपूरमधील ६ विधानसभा मतदारसंघात मनपा सुरू करणार इंग्रजी शाळा'
निखिल हा वधूच्या मैत्रिणीचा नवरा होता. घटनेची माहिती मिळताच कळमना पोलिसांनी घटनास्थळ गाठून निखिलच्या हत्येप्रकरणी वधू पक्षातील 5 आरोपींना ताब्यात घेतले. लग्न सोहळ्यात वर पक्षातील तरुणांनी हत्यार कुठून आणि कशासाठी आणले होते, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
हेही वाचा - वॉकरमधून पडून 17 महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू