नागपूर - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत हजारो लोकांना आपले प्राण गमवावे लागल्यानंतरही विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची संख्या कमी होत नाही. पोलीस प्रशासनाने एका महिन्यात अशा विनाकारण फिरणाऱ्या ९ हजार ३३३ लोकांची 'ऑन दी स्पॉट' अँटिजेन चाचणी केली आहे. त्यापैकी २३३ बेजबाबदार नागरिक पॉझिटिव्ह आढळून आल्याने त्यांची १४ दिवसांसाठी क्वारंटाईन सेंटरला रवानगी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाने दिली.
हेही वाचा - 'लसीचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करावे' या सुचनेवर नितीन गडकरींचं स्पष्टीकरण
कोरोना संसर्गाला प्रतिबंध घालण्यासाठी राज्य शासनाने ३१ मे पर्यंत कडक निर्बंध लावले आहेत. गरज नसेल तर घराबाहेर पडूच नये, असे वारंवार सांगितले जात आहे. पॉझिटिव्ह असताना देखील बेपर्वा फिरणाऱ्या 'सुपर स्प्रेडर'मुळे कोरोना जिल्ह्यांमध्ये वाढला आहे. मात्र, तरीही नागरिक बाहेर पडत असून त्यांच्याविरुद्ध पोलीस प्रशासनाला शेवटी कारवाई करावी लागत आहे. पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी बाहेर विनाकारण फिरणाऱ्यांना मज्जाव करण्याबाबत पोलिसांना निर्देश दिले होते. जिल्हा प्रशासनाने यासाठी पोलिसांची मदत घेतली.
पोलीस विभागामार्फत १७ एप्रिल ते १८ मे या एका महिन्याच्या कालावधीत पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील विनाकारण बाहेर फिरणाऱ्या ९ हजार ३३३ लोकांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली आहे. यामध्ये २३३ जणांची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात आले आहे.
हेही वाचा - विजय वडेट्टीवार चार दिवस कोकण दौऱ्यावर