नागपूर - सर्वत्र कोरोना विषाणू संसर्गाची दहशत असताना राज्याची उपराजधानी नागपुरातून एक दिलासा देणारी बातमी पुढे आली आहे. सध्या नागपूरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या एकूण 416 झाली असताना 336 रुग्णांनी कोरोनवर यशस्वी मात केली आहे. टक्केवारीच्या अनुषंगाने विचार केला तर, नागपुरात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याची टक्केवारी 80 टक्के आहे, ही टक्केवारी देशात सर्वाधिक असल्याचे म्हटले जात आहे.
नागपूरात 11 मार्च रोजी कोरोना विषाणूची लागण झालेला पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर 75 दिवसांच्या कालावधीत नागपुरातील रुग्ण संख्या 416 इतकी झाली आहे. मरकज येथून परत आलेल्या तबलिकी सदस्यांना आणि सतरंजीपुरा, मोमीनपुरा, गड्डीगोदाम या परिसरांत कोरोनाबाधित आढळले होते. सतरंजीपुरा येथील पहिल्या रुग्णामुळे चक्क ११५ लोकांना कोरोनाची लागण झालेली होती. त्यामुळे प्रशासनाला तब्बल 2700 नागरिकांचे विलगीकरण करावे लागले. त्यापैकी अनेकांना अजूनही सोडण्यात आलेले नाही.
सतरंजीपुरा येथून सुरू झालेली कोरोनाची साखळी मोमीनपुरा, पार्वती नगर, गड्डीगोदाम यासारख्या गजबजलेल्या परिसरात जाऊन पोहोचली. परिणामी शनिवारपर्यंत नागपुरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 416 झाली असली तरी कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या देखील 336 इतकी झाली आहे.
महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी वेळेत कोरोनाचा धोका लक्षात घेऊन ज्या परिसरात कोरोनाचा रुग्ण आढळला, त्या भागाला सील करण्याचे काम अतिशय वेगाने केले. कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता त्यांनी नागपुरातून कोरोनाचा नायनाट करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने योजना आखून कंटेंनमेंट झोन तयार केले आणि त्या भागात राहणाऱ्या नागरिकांचा इतर भागातील नागरिकांशी संपर्क होऊ दिला नाही. ज्यामुळे नागपूरात कोरोनाचा धोका कमी करण्यात मोठे यश मिळाले आहे.
75 दिवसांच्या कालावधीत सात रुग्णांचा मृत्यू देखील झालेला आहे. कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्याच्या नियमावलीत बदल केल्यानेच नागपुरातील कोरोनाबाधित बरे होण्याचा दर 80 टक्के झाल्याचे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले.