नागपूर - विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळा अंतर्गत येत असलेल्या गोसीखुर्द सिंचन प्रकल्पातील विविध कामात गैरव्यवहार प्रकरणी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये तत्कालीन मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, विभागीय लेखा अधिकारी अशा मोठ्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
हेही वाचा - याचिकाकर्त्याने सबळ पुरावे न दिल्याने गडकरींना न्यायालयाचा मोठा दिलासा
हेही वाचा - 'कोरोना व्हायरस'ला COVID-19 नावं देण्यामागे काय आहे कारण?
गोसीखुर्द सिंचन प्रकल्पातील विविध 7 कामांच्या निविदेत गैरव्यवहार झाला आहे. या सिंचन घोटाळा प्रकरणी अँटी करप्शन ब्युरोच्या नागपूर कार्यालयाने आज ७ नवे गुन्हे दाखल केले. विदर्भ सिंचन महामंडळाच्या तत्कालीन अधिकाऱ्यांवर हे गुन्हे नागपूरच्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल केले आहेत. मोखाबर्डी, घोडाझरी, नेरला, असोलामेंढा, गोसेखुर्द या प्रकल्पातील कालव्यांच्या कामात निविदा प्रक्रियेत नियमबाह्य कामे करणे, कर्तव्यात कसूर करणे, निविदेचे अद्ययावतीकरण करताना नियमांचे उल्लंघन करणे, त्यात नियमबाह्य गोष्टींचा समावेश करणे, काम मिळालेल्या कंत्राटदार फर्मची रीतसर नोंदणी नसतानाही त्यांना निविदा प्रक्रियेत सहभागी करणे असे आरोप ठेऊन या अधिकाऱ्यांना आरोपी बनवण्यात आले आहे.