नागपूर - येथील मध्यवर्ती कारागृहातील दहा जणांना कोरोना झाल्याचे मंगळवारी (दि. 30 जून) निष्पन्न झाले होते. त्यानंतर बुधवारी (दि. 1 जुलै) आणखी 44 जण कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. आज कोरोनाबाधित आढळलेल्यामध्ये मध्यवर्ती कारागृहाचे काही कर्मचाऱ्यांसह त्यांचे काही कुटुंबियही कोरोनाबाधित आढळले आहे. त्यामुळे नागपूर मध्यवर्ती कारागृहाचे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय मिळून दोन दिवसात 54 जण कोरोनाबाधित आढळले आहेत.
नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात केवळ दोनच दिवसात अधिकारी, कर्मचाऱ्यांसह त्यांचे कुटुंबीय अशा 54 जणांना कोरोना झाल्याने खळबळ माजली आहे. सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहातून पॅरोलवर सोडललेल्या साडेसातशे कैद्यानंतरही कारागृहात सुमारे अठराशे कैदी कैद आहेत. याच कैद्यांवर नजर ठेवण्यासाठी सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे दोन पथकमध्ये विभागून प्रत्येकी पंधरा दिवस कारागृहाच्या आत आणि पुढील पंधरा दिवस क्वारंटाईन अशा स्वरूपात काम करत आहेत.
11 जून ते 26 जून दरम्यान तुरुंग प्रशासनातील जे अधिकारी आणि कर्मचारी कारागृहाच्या आत होते. त्यापैकी एक कर्मचारी कारागृहातून बाहेर आल्यानंतर कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. त्या नंतर मंगळवारी 30 अधिकारी व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये एक अधिकारी आणि आठ कर्मचारी पॉझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाल्याने खळबळ माजली होती. मात्र, आज हा आकडा 44 ने वाढल्याने कारागृहातील अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, जो पहिला कर्मचारी कोरोना बाधित आला होता तो कारागृहाच्या आत असतानाच त्याला ताप आला होता. नंतर त्याची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्यामुळे कारागृहाच्या आतील कैद्यांनाही संक्रमण तर झाला नसावा ना अशी शंका निर्माण झाली आहे.
हेही वाचा - खंडणी आणि फसवणूक प्रकरणी शिवसेनेच्या नेत्यावर नागपुरात गुन्हा दाखल