नागपूर - जिल्ह्यातील काटोल शहरात ( Boy died in stray dog attack in katol ) धक्कादायक घटना घडली. शहरातील पॉश वस्ती समजल्या जाणाऱ्या धंतोली भागात भटक्या श्वानांच्या हल्ल्यात पाच वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे. परिसरातील नागरिकांच्या अनेक तक्रारी करूनही नगरपरिषदेने ( Dog attack in katol of nagpur district ) भटक्या श्वानांचा बंदोबस्त न केल्याने आज चिमुकल्याच्या जिवावर बेतले. ही धक्कादायक घटना आज सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. विराज, जयवार असे चिमुकल्याचे नाव आहे.
हेही वाचा - Minister Vijay Vadettiwar : सरसंघचालकांच्या भूमिकेचे स्वागत, परंतु त्यांनी ठाम राहावे - विजय वडेट्टीवार
पाच वर्षीय विराज जयवार हा त्याच्या मोठ्या बहिणीसह घरासमोर फिरत असताना त्याच्यावर अचानक एका भटक्या श्वानाने हल्ला केला. घाबरलेल्या विराजने धावून जात स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. मोठी बहीण जिवाच्या आकांताने आरडाओरड करत होती, पण श्वानाने अंगावर धावून जात विराजला पकडले. पाहता पाहता दहा ते बारा भटक्या श्वानांनी विराजवर हल्ला केला. श्वानांनी लचके तोडत काही अंतरापर्यंत त्याला ओढत नेले. त्यानंतर एका ठिकाणी वाळू साठवलेली होती, श्वानांनी विराजचे त्या ठिकाणी लचके तोडले. वस्तीतील नागरिक जोवर विराजला वाचवण्यासाठी धावत त्या ठिकाणी पोहोचले तोपर्यंत त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
काटोल नपचे दुर्लक्ष विराजच्या जिवावर बेतले - वस्तीतील नागरिकांनी यापूर्वी अनेक वेळेला भटक्या श्वानांच्या त्रासाबद्दल स्थानिक प्रशासनाकडे तक्रार केली होती. अनेक दिवस हे भटके श्वान नागरिकांवर हल्ले करत होते, पण प्रशासन कुंभकर्ण निद्रेत होते. नागपूर जिल्ह्यातील टाकळघाटमध्ये जानेवारीमध्ये अशाच पद्धतीने भटक्या श्वानांनी हल्ला केल्याच्या घटनेत अंजली रावत नामक बालिकेचा मृत्यू झाला होता.