नागपूर - नागपुरातील उष्णतेच्या लाटेत एका आठवड्यात ४५ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे येथील पोलीस विभागामध्ये दररोज ५-६ जणांच्या आकस्मिक मृत्यूची नोंद होत आहे. यामध्ये फुटपाथवर वास्तव्यास राहणाऱ्यांची संख्या आहे. तर विशेष म्हणजे बुधवारी एका दिवसात ५ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
या सर्वांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी या लोकांचे उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचे सांगितले आहे. तर पावसाळा जवळ आला असतानाही उष्माघाताच्या रुग्णांची संख्या जास्त असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार यंदाच्या उन्हाळ्यात मनपाच्या रुग्णालयात ३०० पेक्षा जास्त उष्माघाताचे रुग्ण आहेत. उष्माघाताचा धोका कमी व्हावा, यासाठी मनपा प्रयत्न करत असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.