नागपूर- शहाराजवळ असलेल्या मिहान एसईझेड प्रकल्प परिसरात वाघाची दहशत अजूनही कायम आहे. सलग तीन दिवस वाघाने दर्शन दिल्यानंतर वन विभागाने त्या परिसरात 40 कॅमेरे लावले आहेत. मिहानपासून काही अंतरावर असलेल्या सुमठाणा परिसरात वनविभागाला वाघाच्या पावलांचे ठसे आढळून आल्याने परिसरात वाघ असल्याचे निश्चित झाले आहे.
हेही वाचा- भारतीय वायुसेनेला मिळाली तीन 'राफेल' विमाने, वैमानिकांचे प्रशिक्षण सुरू
मिहान एसईझेड प्रकल्प परिसरात वाघाचा वावर असल्याचे आधीच सिद्ध झाले आहे. त्यामुळे अनेक नामांकीत कंपन्यांचे कार्यालय आणि युनिट्स असलेल्या मिहानमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिहान विशेष आर्थिक क्षेत्रामधील याच रस्त्यावर दोघांना वाघ दिसला होता. त्यांनी लगेच वन विभागाला यासंदर्भात माहिती दिल्यानंतर वन अधिकाऱ्यांनी गेल्या 3 दिवसांपासून वाघाचे वावर असलेल्या परिसरात पाहणी सुरू केली आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांना काही ठिकाणी वाघाच्या पायाचे ठसे आढळले. त्यानंतर घटनेचे गांभीर्य ओळखत वन विभागाने सुरुवातीला मिहान परिसरात सुमारे 25 कॅमेरा ट्रॅप लावले. त्यापैकी एका कॅमेरा ट्रॅपमध्ये रात्रीच्या वेळी वाघाची उपस्थिती चित्रित झाली आहे. आता वनविभागाने कॅमेऱ्याची संख्या 25 वरून 40 केली आहे. गेल्या काही दिवसांपासून मिहान आणि लगतच्या परिसरात ठाण मांडून बसलेल्या वाघोबाने बुटीबोरी क्षेत्रातील सुमठाण परिसरात दर्शन दिल्याची माहिती पुढे आल्यानंतर वनविभागाने त्याभागात गस्त वाढवली आहे.