नागपूर - उपराजधानीत आज कोरोना रुग्णांच्या संख्येत ३० ने वाढ झाली. नव्याने सापडलेल्या रुग्णांमुळे नागपुरातील एकूण रुग्णासंख्या ९७९ झाली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून कोरोनाबाधित रूग्ण पुढे येण्याचे प्रमाण वाढले असून नागपुरातील रुग्णसंख्या लवकरच हजारचा टप्पा ओलांडण्याची चिन्हे आहेत.
आज आढळलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये मोमीनपुरा, नाईक तलाव, बांग्लादेश, भानखेड, अमरनगर, हिंगण्यासह अन्य काही कंन्टेंन्मेट झोनमधील नागरिकांचा समावेश आहे. आज पॉझिटिव्ह आलेले सर्व रूग्ण संशयित असल्याने त्यांना प्रशासनाने अगोदरच क्वारंटाईन केलेले होते. दरम्यान, आज १६ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आत्तापर्यंत ५७१ रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. याशिवाय आत्तापर्यंत नागपुरात १५ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू देखील झाला आहे.
सध्या जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ४०८ इतकी झाली आहे. हिंगणा तालुक्यातील हसीब फर्मास्युटिकल कंपनीमधील 3 व्यक्तींचा अहवाल पोझिटिव्ह आल्याने ही औषध कंपनी तात्पुरती बंद करण्यात आली आहे.
राज्यात आज दिवसभरात १ हजार ५५० रुग्णांना घरी सोडण्यात आले. आत्तापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ४९ हजार ३४६ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ३ हजार ४२७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या ५१ हजार ३७९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.