नागपूर - जिल्ह्यातील बुटीबोरी येथे आठवडी बाजारासाठी जाण्यास निघालेल्या तीन कामगारांना रेल्वेने धडक दिली. यामध्ये तिघांचाही मृत्यू झाला. गोदावरी नगरजवळचा रेल्वे रूळ ओलांडताना सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. मृतांमध्ये 1 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश आहे.
हेही वाचा - संजय राऊत यांची हकालपट्टी करा; संभाजी भिडेंची मागणी
हेही वाचा - भिडेंचा बंद हे राजकीय षडयंत्र - सुप्रिया सुळे
शारदा शेखलाल सयाम (वय - १९), कमलेश गोधनलाल मरसकोल्हे (वय - २२) आणि योगेश उईके (वय - २०, तिन्ही रा. मुराही टोला, जि. शिवणी, मध्यप्रदेश) असे मृतांचे नाव आहे. हे सर्वजण बुटीबोरीजवळच्या विधी महाविद्यालयाच्या बांधकामासाठी कामगार म्हणून कामाला होते. बुटीबोरी येथील शुक्रवारचा आठवडी बाजार असल्याने ते बुटीबोरीकडे येताना रेल्वे रूळ ओलांडत होते. यावेळी दोन्ही मार्गावर अचानक रेल्वे गाड्या आल्यामुळे त्यांचा गोंधळ झाला. यामुळे त्यांना आपला तोल सावरता आला नाही आणि त्यांचा अपघात होऊन मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांसह बुटीबोरीचे पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख, पोलीस उपनिरीक्षक अमोल लगड, मिलिंद नांदूरकर, सतेंद्र रंगारी, संजय बांते, विनायक सातव, खुशाल शेगोकर यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी नागपूर येथील शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे. घटनेची नोंद करण्यात आली आहे, तर पुढील तपास बुटीबोरी पोलीस करीत आहेत.