नागपूर: जिकडे-तिकडे लग्न सराईची धूम सुरू असून चोरट्यांचा सुळसुळाट वाढला आहे. नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सूर्योदय नगरातील रेवती-अपूर्वा सोसायटी येथे राहणारे फिर्यादी नरेंद्र कोहाड हे शेजारी राहणाऱ्या मुलाच्या लग्नाच्या रिशेप्शनमध्ये गेले होते. ते अर्ध्या तासाने घरी परतले असता चोरट्यांनी तब्बल २२ लाखांच्या मुद्देमालावर हात साफ केल्याचं त्यांच्या लक्षात आले.
३० मिनिटांमध्ये २२ लाखांवर डल्ला: नरेंद्र कोहाड यांनी हुडकेश्वर पोलिसांना दिलेली माहितीनुसार, ते घराला कुलुप लावून रिसेप्शनकरिता स्वामी समर्थ सभागृह हुडकेश्वर येथे गेले होते. यावेळी चोरट्यांने त्यांच्या घराच्या संरक्षण भिंतीवरून आत प्रवेश करून घराचे किचन रूमचे लोखंडी चॅनल गेटचे लॉक तोडले आणि किचन रूमचा लाकडी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. घरातील बेडरूममधील लाकडी अलमारी उघडून त्या मधील सोन्याचे दागिने, रोख असा २२ लाखांचा मुद्देमाल चोरून नेला.
गुन्हा दाखल,आरोपींचा शोध सुरू: विशेष म्हणजे, घरात पाळीव कुत्रा असताना देखील चोरट्यांनी चोरी केली असून एखाद्या ओळखीच्या व्यक्तीचा सहभाग यामध्ये असू शकतो, अशी शंका व्यक्त केली जात आहे. फिर्यादी यांनी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुध्द विविध कलमांन्वये गुन्हे नोंदवून आरोपीचा शोध सुरू केला आहे.
भाजी विक्रेत्याच्या घरात चोरी: यवतमाळमध्ये सहकुटुंब बाहेरगावी गेलेल्या एका भाजीपाला विक्रेत्याच्या घरात डिसेंबर, 2022 मध्ये चोरी झाली होती. ही घटना रविवारी 11 डिसेंबर रोजी अरुणोदय सोसायटी यवतमाळ येथे उघडकीस आली. यामध्ये सोने-चांदी रोख असा एकूण 27 लाखांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. दरम्यान चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
साहित्य अस्थाव्यस्थ: हिरालाल गया प्रसाद जयस्वाल असे घरपोडी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. आरोपी अरुणोदय सोसायटीत राहतात. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जयस्वाल कुटुंब हे काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. हीच संधी साधून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर शोधाशोध घेऊन मुद्देमाल लंपास केला. दरम्यान कुटुंबातील बाहेरगावी गेलेले काही सदस्य परत आल्यानंतर चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला.