नागपूर - गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने एका महिलेला अटक करून तिच्या जवळून २० ग्रॅम हेरॉईन पावडर जप्त केली आहे. अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव चंदाबाई ठाकूर असे आहे. यापूर्वी अमली पदार्थ तस्करीच्या आरोपाखाली या महिलेला अटक करण्यात आली होती.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, चंदाबाई प्रदीपसिंग ठाकूर ही महिला नागपूरच्या शांतीनगर पोलीसठाण्याच्या हद्दीत राहते. पोलिसांनी यापूर्वीही अमली पदार्थ तस्करी आणि विक्रीच्या आरोपाखाली तिला अटक केली होती. चंदाबाई पुन्हा हिरोईनची तस्करी करत असल्याची पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती.
त्यानुसार अमली पदार्थविरोधी पथकाने सापळा रचून तिला ताब्यात घेतले. यावेळी तिच्याजवळून २० ग्रॅम हिरोईन पावडर जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या हेरॉईन पावडरची किंमत ८० हजार रुपये एवढी आहे. मागील काही काळात नागपुरात अमली पदार्थांची विक्री वाढली असून पोलिसांच्या कारवाईतसुद्धा वाढ झाली आहे.