नागपूर- कोरोनाच्या काळात सर्वत्र उदासीनता व नकारात्मक वातावरण पहायला मिळत आहे. अशावेळी सर्वसामान्य नागरिक विविध बाबींमधून आनंद शोधण्याचा प्रयत्न करतांना दिसून येत आहे. मात्र नागपूरकरांच्या नकारात्मकेवर परिणामकारक ठरलाय तो 'फ्लाँवर फेस्ट'. शहरातील हिस्लॉप महाविद्यालयात हे फुलांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. यात शेवंती फुलांच्या तब्बल १०० पेक्षा अधिक प्रजातींची रोपे उपलब्ध आहेत. शिवाय या प्रदर्शनात नागरिक मोठ्या प्रमाणात फुलांच्या रोपांची खरेदी देखील करत आहेत.
१७ वर्षापासून प्रदर्शनाचे आयोजन
शहरातील हिस्लॉप महाविद्यालय वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने गेली १७ वर्षापासून या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात येत आहे. दरवर्षी या प्रदर्शनाला मोठ्या प्रमाणात नागरिक भेटी देतात. परंतु यंदा मात्र कोरोना संकटामुळे सर्व खबरदारी घेऊन हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. गेल्या अनेक महिन्यापासून घरात बंदिस्त असलेले नागपूरकर या प्रदर्शनाला सहपरिवार भेट देत आहेत. शिवाय फुलांसोबत फोटो काढत फुलांचे सौंदर्य आपल्या मोबाईलमधे टिपण्याचा प्रयत्नही करताना दिसत आहेत.
![नागपूरकरांसाठी खास पर्वणी: रंगीबेरंगी शेवंतीच्या १०० प्रजातींचे प्रदर्शन](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/9871021_nag.jpg)
प्रदर्शनासोबत फुलांची विक्री-
प्रदर्शनाचा मुख्य उद्देश म्हणजे शेवंती प्रजातीसह इतरही फुलांचे महत्व कायम लोकांना कळावे. तसेच फुलांचे संवर्धन पुढेही होत राहावे. या प्रदर्शनात फुलांच्या रोपट्यांची विक्री सुद्धा केली जाते. प्रत्येक प्रजातीची किंमत ४० ते ६० रूपये इतक्या ठराविक स्वरूपात ठेवण्यात आली आहे. त्यामुळे खरेदी करण्यासाठीही नागरिक मोठी गर्दी करत असल्याचे पहायला मिळत आहे. या प्रदर्शनात शेवंतीसह विविध जातींची झेंडू फुले देखील पहायला मिळत आहे.
![नागपूरकरांसाठी खास पर्वणी: रंगीबेरंगी शेवंतीच्या १०० प्रजातींचे प्रदर्शन](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/9871021_nagpur-3.jpg)
फुलांबरोबर खतांचीही निर्मिती-
या रोपांच्या संवर्धनासाठी महाविद्यालयाकडून गांडुळ खताची निर्मिती करण्यात आली असून तेही विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे. एकंदरीत कोरोनामुळे त्रस्त झालेल्या नागपूरांमध्ये या प्रदर्शनामुळे उत्साह निर्माण झाला आहे.
![नागपूरकरांसाठी खास पर्वणी: रंगीबेरंगी शेवंतीच्या १०० प्रजातींचे प्रदर्शन](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/9871021_nagpur.jpg)
हेही वाचा- बहुचर्चित "शक्ती" विधेयक विधानसभेत सादर; महिला अत्याचाराला बसणार खिळ