नागपूर : वेध शाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार नागपूर शहरासह संपूर्ण जिल्हाला अवकाळी, वादळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसला आहे. संध्याकाळी अचानक वातावरणात बदल झाला. सोसाट्याचा वारा आणि विजेच्या कडकडाटात मुसळधार पाऊसाला सुरवात झाली. जिल्ह्यात ठिकठिकाणी गारपीट झाली आहे. शहरातील त्रिमूर्ती नगर परिसरता अगदी छोट्या स्वरूपात गारपीट झाली. मात्र जोरदार पाऊस झाला आहे.
गारपिटीमुळे १२ हजार कोंबड्यांचा मृत्यू : हिंगणा तालुक्यातील येरणगाव-दाभा येथे 12 १२ हजार कोंबड्यांचा गारपिटीमुळे मृत्यू झाला आहे. मंगळवारी सायंकाळी नागपूर शहरात आणि जिल्हात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस व गारपीट झाली. रोशन देवराव निंबुलकर यांच्या मालकीचे येरणगाव दाभा येथे पोल्ट्री फार्म आहे. दोन शेडमध्ये प्रत्येकी सहा हजार अशा एकुण बारा हजार कोंबड्या होत्या. गारपीटीच्या तडाख्यामुळे पोल्ट्री फार्मच्या दोन शेडमधील १२ हजार कोंबड्या दगावल्या आहेत. पोल्ट्री फार्म व्यावसायिक देवराव निंबुलकर यांचे सव्वा लाखाचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा पंचनामा करून नुकसानग्रस्त व्यावसायिकला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
गेल्या आठवड्यात चौघांचा मृत्यू : गेल्या आठवड्यात गुरुवारी नागपूरसह संपूर्ण जिल्ह्याला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसला होता. त्यात चौघांचा मृत्यू झाला होता. शहरातील सदर पोलीस स्टेशनच्या हद्दीत जे.पी टाऊनची सुरक्षा भिंत कोसळून माय- लेकाचा मृत्यू झाला होता, तर सोसाट्याच्या वाऱ्याने घराचे छत कोसळून पती पत्नीच्या मृत्यूची नोंद झाली होती. आजपासून पुढील पाच ते सात दिवस विजेच्या कडकडाटसह पाऊस आणि गारपिटीची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरात अँटीसायक्लोनिक : प्रादेशिक वेध शाळेचे संचालक मोहनलाल साहू यांनी दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात अँटीसायक्लोनिक स्थिती निर्माण झाली आहे, तेथून येणाऱ्या आद्रता वाऱ्यामुळे तापमानात घट झाली असल्याने अनेक भागात अवकाळी पावसाची शक्यता आहे. सध्या दक्षिण-पूर्वीकडील हवेचा जोर वाढल्याने उत्तरेकडील उष्ण वाऱ्यांचा जोर कमजोर पडला आहे. त्यामुळे विदर्भावर सलग पाच ते सात दिवस आकाशात ढगांची गर्दी जमेल आणि अवकाळी पावसाचा धोका निर्माण होईल, अशी माहिती नागपूर प्रादेशिक हवामान विभागाचे संचालक मोहनलाल साहू यांनी दिली आहे.