नागपूर - निसर्गाच्या दुटप्पी भूमिकेमुळे भीषण दुष्काळाच्या सावटाखाली असलेल्या नागपूर जिल्ह्यात बुधवारपासून दमदार पावसाला सुरूवात झाली आहे. तर दुष्काळग्रस्त असलेल्या नरखेड तालुक्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. केवळ १२ तासात एकट्या नरखेड तालुक्यात १०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे अनेक छोट्या नद्या आणि नाल्या तुडुंब भरून वाहत आहेत.
पावसाळा सुरु होऊन २ महिने लोटले असतानादेखील नागपूर जिल्ह्यात समाधानकारक पावसाची प्रतीक्षा कायम होती. पावसाने दगा दिल्यामुळे अनेक ठिकाणी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. पाणीपुरवठा करणारी जलाशये कोरडी पडल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होईल असे वाटत होते. दरम्यान, बुधवार रात्रीपासून नागपूर जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे. केवळ १२ तासात एकट्या नरखेड तालुक्यात १०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्याच्या जलालखेडा-वरुड मार्गावर भरसिंगीजवळ जाम नदीला पूर आले आहे.
पुराचे पाणी रस्त्यावरुन वाहत असल्याने सकाळी काही काळ वाहतूक थांबली होती. मात्र, पाणी ओसरताच वाहतूक पूर्ववत झाली. तर वरुड मार्गचे सिमेंटीकरण केल्याने रस्त्याची उंची वाढली. या रस्त्याच्या तुलनेत अवतीभवतीच्या शेतजमिनी खाली आहेत. परिणामी पावसाचे पाणी शेतीमध्ये जाऊन शेतात तलावसदृश स्थिती निर्माण झाली आहे. बुधवारी नागपूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त काटोल तालुक्यातही दमदार पाऊस झाला. मात्र, दुष्काळ जाहीर झालेल्या कळमेश्वर तालुक्यात समाधानकारक पाऊस न पडल्याने पिके आणि पिण्याच्या पाण्याची स्थिती विदारक आहे. एकाच जिल्ह्यात दोन वेगवेगळे चित्र बघायला मिळत आहे.