मुंबई : पावसाळ्यात आरोग्याची अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झालीयं. मुंबईतील चेंबूर परिसरात झिका व्हायरसचा रुग्ण आढळल्याचे समोर आलंय. त्यामुळं बृहन्मुंबई महानगरपालिका सतर्क झाली आहे. या पार्श्वभूमीवर बीएमसीनं प्रसिद्धीपत्रक जाहीर केलंय. झिका विषाणूचा संसर्ग हा 'स्वयंमर्यादित' आणि लवकर बरा होणारा आजार आहे, त्यामुळं नागरिकांनी घाबरून जाण्याचं कारण नाही, असं बीएमसीनं म्हटलंय.
80 टक्के लोकांना आजाराची लक्षणं नाही : पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीने पुष्टी केली की, उपनगरातील चेंबूर येथील रहिवासी असलेल्या रुग्णाला झिका विषाणूची लागण झाली होती. या रुग्णाचं वय 79 वर्ष आहे. त्याला 19 जुलै 2023 पासून ताप, नाक चोंदणे आणि खोकला ही लक्षणे होती. खासगी रुग्णालयात त्याला चांगले उपचार मिळाले. रुग्ण बरा झाला असून 2 ऑगस्ट रोजी त्याला घरी सोडण्यात आलंय. या रुग्णाची 20 वर्षांपूर्वी रुग्णाची अँजिओप्लास्टी झाली होती. त्याला मधुमेह, उच्च रक्तदाब, इस्केमिक हृदयविकार आणि थॅलेसेमिया मायनर यांसारखे अनेक आजार आहेत. झिका विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांपैकी सुमारे 80 टक्के लोकांना आजाराची लक्षणं नाहीत, असं त्यांनी सांगितलंय.
डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी पावले : रुग्णाच्या आजूबाजूच्या घरांचं देखील यावेळी सर्वेक्षण करण्यात आलं. परंतु इतर कोणालाही संसर्ग झाल्याचं आढळलं नाही, असं बीएमसीने सांगितलंय. झिका विषाणू रोगाचा प्रसार हा डेंग्यू आणि चिकनगुनियाचा प्रसार करणार्या एडिस डासांमुळे होतो, असं बीएमसीनं म्हटलंय. इमारतींच्या पार्किंगमध्ये एडीस डास आढळून आलेत. वेक्टर नियंत्रणाचे उपाय हाती घेण्यात आले, असं त्यात म्हटलं आहे. लोकांनी घाबरून जाऊ नये. परंतु डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी पावले उचलावीत, असे त्यात म्हटलं आहे.
झिका विषाणूच्या संसर्गाची लक्षणे कोणती : झिका विषाणू चाचणी सुविधा नागरी संचालित केईएम रुग्णालयात उपलब्ध आहे. ताप येणं, त्वचेवर पुरळ उठणं, डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा दाह होणं, स्नायू आणि सांधेदुखी, अस्वस्थता आणि डोकेदुखी ही झिका विषाणूच्या संसर्गाची लक्षणं आहेत, असं बृहन्मुंबई महानगरपालिकेनं म्हटलंय. (पीटीआय)
हेही वाचा :