मुंबई : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा ओडीसात अवमान केला जात आहे. संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी युवासेनेकडून करण्यात आली आहे. ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांना या संदर्भात युवा सेनेचे कार्यकारणी सदस्य राहुल कनाल यांनी पत्रव्यवहार केला आहे. यावर सरकार काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. देशाचे प्रेरणास्थान आणि आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयी राज्याचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या अवमानाची चीड महाराष्ट्रीयांच्या मनात धगधगत आहे. अशा वातावरणात भाजपच्या नेत्यांकडून सातत्याने अपमानास्पद, आक्षेपार्ह विधाने आणि मजकूर लिहिण्याचा प्रकार सुरू आहे.
काय म्हटले पत्रात : मी एक भारतीय नागरिक आहे. एक मराठी माणूस आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत आहेत. ओडिसातील बेहरामपूर गावातील मावा मसाला शिवाजी इंडस्ट्रीज या कंपनीकडून त्यांच्या नावाचा अंमली पदार्थाला व्यवसायासाठी नाव वापरत आहे. केवळ नाव नव्हे, तर त्या पदार्थांच्या आवरणावर शिवरायांचे फोटो छापले आहे. हा आमच्या दैवताचा अपमान आहे. मुख्यमंत्री म्हणून आपणांस नम्र विनंती आहे की, संबंधित कंपनीला सक्त ताकीद देऊन तात्काळ कारवाई करावी. लवकरात लवकर हे नाव बदलण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी कनाल यांनी केली आहे.
महाराजांचा भाजपकडून यापूर्वी अवमान : तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मंत्री चंद्रकांत पाटील, मंगल प्रभात लोढा, भाजप नेते सुधांशू त्रिवेदी, प्रसाद लाड या भाजप नेत्यांकडून सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अपमानास्पद वक्तव्य करण्यात आली. छत्रपती शाहू महाराज, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतही चुकीचे वक्तव्य केली गेली. महापुरुषांबाबत सतत होणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यामुळे महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले होते. राज्यभरात भाजप नेत्यांच्या विरोधात निदर्शने करत बंद देखील पाळण्यात आला. सध्या हे प्रकरण निवडले असताना, भाजपची सत्ता असलेल्या ओडिसा राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा अमली पदार्थ विक्रीसाठी वापर करण्यासाठी फोटो वापरल्याचे प्रकार समोर आले आहे.
हेही वाचा : Mungantiwar On Shivaji Sword : 'ब्रिटनमधून छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार परत आणणार'