मुंबई : एकीकडे कोरोना विषाणूचा हाहाकार तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे कामे नाहीत. त्यामुळे नैराश्य अशा विविध समस्यांनी नागरिक ग्रासलेले आहेत. त्यामुळे काहीजण आत्महत्या करत असल्याने प्रचंड चिंतेचा विषय बनला आहे.
पवईतील जलवायू विहार म्हाडा वसाहत येथील एका ४६ वर्षाच्या व्यक्तीने कारमध्येच नैराश्येतून आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना पवईतीलच गौतम नगर झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या स्वप्निल पाष्टे नावाच्या २२ वर्षीय तरुणाने घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी उघडीस आली आहे. स्वप्निल हा गौतम नगर परिसरात आपल्या कुटुंबियांसह राहत होता. लॉकडाऊन काळात वडिलांची प्रकृती ठिक नसल्याने घरातील आई-भावंडे हे वडिलांना घेऊन रत्नागिरी येथे उपचारासाठी घेवून गेले होते. त्यामुळे स्वप्निल घरी एकटाच राहत होता.
दोन दिवसांपासून स्वप्निल हा घरातील पाणी भरत नसल्याचे लक्षात आले व दरवाजाही बंद अवस्थेत होता. दुपारी मात्र पाणी भरण्यासाठी स्वप्निलला आजुबाजुच्या स्थानिकांनी आवाज दिला. तर त्यास स्वप्निलने कोणताच प्रतिसाद दिला नाही, असे स्थानिक नागरिक सांगतात. रविवारी प्रचंड दुर्गंधी येत असल्याने नागरिकांनी पोलिसांना कळवले. यावेळी, स्वप्निलचा दरवाजा उघडला तेव्हा स्वप्निलचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. स्वप्निलने आत्महत्या कशामुळे केली याचा तपास पोलीस करत असून मृतदेहाशेजारी कोणतीच सुसाईड नोट सापडलेली नाही. दरम्यान पोलिसांनी एडीआर नोंदवून मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवला आहे.