मुंबई - अंधेरी रेल्वे स्थानकाच्या रुळावर धोकादायक स्टंट करणाऱ्या युवकास रेल्वे पोलिसांनी अटक केली. सोशल मीडियावर स्टंटचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी ही कारवाई केली. अटक केलेल्याचे नाव अरमान शेख आहे. घाटकोपर भागातून त्याला ताब्यात घेण्यात आले.
व्हिडिओत काय?
आरोपी तरुण मंद प्रकाशात बंदूक घेऊन रेल्वे रुळाजवळ बसला असून त्याच्या मागून एक रेल्वे जात आहे. यादरम्यान तो एक बंदूक उचलतो आणि स्वत:वर गोळीबार करतो. यादरम्यान, तो रडतानाही दिसत आहे. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये तो बंदूक त्याच्या कानाजवळ ठेवतो आणि स्वत: वर गोळी मारण्याचे भासवत तो ट्रॅकच्या मध्यभागी पडला.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे पोलिसांच्या तपासात हा अंधेरी स्थानकाच्या ट्रॅकवर चित्रित करण्याच दिसून आले. ही माहिती मिळताच रेल्वे पोलिसांच्या पथकाने आरोपी अरमान शेख याला अटक केली. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोन्ही व्हिडिओ 8-10 दिवसांपूर्वी तयार केले गेले होते आणि 8 जूनला आरोपीने सोशल मीडियावर पोस्ट केले होते.
हेही वाचा - Mystery Girl.. घरात आली तेव्हा १८ वर्षांची, घराबाहेर पडली तेव्हा २८ वर्षांची, वाचा रहस्यमयी कहाणी
आरोपीने सोशल मीडियावर हा अत्यंत धोकादायक व्हिडिओ शूट करत खूप अॅक्टिंग केल्याचा अभिमान दाखविला होता. मात्र, पोलिसांनी त्याला पकडल्यानंतर लगेचच आपली चूक मान्य केली आणि माफी मागण्यास सुरूवात केली. दरम्यान, या आरोपीने आणखी बरेच स्टंट केल्याचे व्हिडिओही समोर आले आहे. त्याच्याविरोधात मुंबई पोलिसात स्टंट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, आरोपी स्टंटमॅनला अटक केल्यानंतर त्याच्याबरोबर आणखी कोण आहेत, याचा शोध घेण्याचा प्रयत्न रेल्वे पोलीस करत आहेत.