मुंबई - यंदाच्या गणेशोत्सव हा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साध्या पद्धतीने साजरा केला जात आहे. दरवर्षी विविध मंडळे वेगवेगळ्या कलाकृती गणेशोत्सवात साकारतात. यंदा मात्र कोणीही वेगळी सजावट केलेली नाही. भाविकांना वेगळी कलाकृती पाहता यावी या दृष्टीकोनातून कलाकार निलेश चौहान यांनी पक्ष्याचे पीस घेऊन त्यावर गणपती बाप्पाचे चित्र रेखाटले आहे. टर्की, स्टारलेट मकाऊ पक्षाच्या पंखावर आणि मोराच्या पिसावर निलेश यांनी गणपती बाप्पा साकारला आहे. यासाठी त्यांना दोन दिवसाचा कालावधी लागला.
चार महिने टाळेबंदी असल्यामुळे लोकांना अनेक सण साजरा करता आले नाहीत. यंदाचा गणेशोत्सव देखील साध्या पध्दतीने साजरा करण्यात येत आहे. यामुळे भाविकांना बाप्पाची अनोखी कलाकृती बघण्यास मिळावी, यासाठी मी पक्ष्यांच्या गळालेल्या पंखावर हे चित्र कोरले आहे. तीन वेगवेगळे चित्र यावेळी मी तयार केले आहेत. हे तयार करण्यासाठी मला दोन दिवसांचा कालावधी लागला. तसेच हे पंख मी ज्यांच्याकडे पाळीव पक्षी आहे त्याच्याकडून घेतले असल्याचे निलेश यांनी 'ईटिव्ही भारत'ला सांगितले.
निलेश यांनी पक्ष्याचा पंखांवर अत्यंत कोरीव पद्धतीने काम केलं आहे. कलाकृती पाहून त्यांनी केलेल्या बारिक कामाचा प्रत्यय येतो. निलेश हे पंखावर आणि अनोखी कलाकृती तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. आतापर्यत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, गौतम बुद्ध असे विविध कलाकृती तयार केल्या आहेत. विशेष बाब म्हणजे, पंखावर चित्र कोरणारे भारतात निलेश हे एकमेव कलाकार आहेत.
हेही वाचा - मुंबईत पहिल्यांदाच ध्वनीप्रदूषणमुक्त वातावरणात बाप्पाचे विसर्जन; 53 ते 100.7 डेसीबलपर्यंत आवाजाची नोंद