मुंबई - आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन येथील हिरवळीवर आयोजित योगवर्गात सहभागी होऊन योगासने केली. यावेळी राजभवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील योगवर्गात सहभाग घेतला.
कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर योग वर्गामध्ये उपस्थितांच्या आसन व्यवस्थेमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्यासह इतर योग्य खबरदारी घेण्यात आली. मुंबईच्या सांताक्रूझ येथील ‘द योग इन्स्टिट्यूट’ या संस्थेच्या वतीने योगवर्गाचे आयोजन करण्यात आले होते.
योगाभ्यास हा आपल्याला शारीरिक आणि मानसिक संतुलन राखण्यासाठी मदत करतो. अध्यात्म आणि विज्ञान यांचा संतुलित संगम म्हणजेच योग. भारताने अवघ्या विश्वाला दिलेल्या अनेक देणग्यांपैकी एक म्हणजे योग! योग आणि योगाभ्यासाबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर जनजागृती करण्यासाठी 21 जून हा दिवस 'आंतरराष्ट्रीय योग दिन' म्हणून साजरा करण्यात येतो.
27 सप्टेंबर, 2014मध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना मांडली. यावेळी त्यांनी सांगितले, की योग हा केवळ एक व्यायामप्रकार नसून, आपल्या 'स्व'चा शोध घेण्याचा, मन शांती प्राप्त करण्याचा आणि मानसिक व शारीरिक संतुलन राखण्याचा एक मार्ग आहे. त्यानंतर दरवर्षी 21 जूनला 'जागतिक योग दिन' साजरा करण्यात येतो.
दरम्यान, आज सहाव्या योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले, की जर रोग प्रतिकारशक्ती चांगली असेल तर आपण कुठल्याही रोगाशी लढू शकतो. मात्र, रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी योगा करणे गरजेच आहे. योगामधील वेगवेगळ्या आसनांमधून आपण रोग प्रतिकारक शक्ती वाढवू शकतो. कोरोना मानवी शरीराच्या श्वसनसंस्थेवर परिणाम करते. त्यामुळे प्राणायाम किंवा श्वासाचे व्यायाम करणे गरजेचे आहे. प्रामाणिपणे काम करणे हा सुद्धा एक प्रकारचा योग असल्याचे मोदींनी सांगितले.
हेही वाचा - संशोधक विद्यार्थ्यांना दिलासा... युजीसीकडून फेलोशिपमध्ये वाढ