मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल संसदेत भाषण करताना, मागच्या काही काळात आंदोलनजिवी पाहायला मिळत असल्याचे म्हटले होते. त्यावर, शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट करून ‘होय, आम्ही आंदोलनजिवी असल्याचा आम्हाला अभिमान आहे, 'जय जवान, जय किसान’ असे ट्वीट करून पंतप्रधानांना प्रत्युत्तर दिले आहे.
हेही वाचा - मुंबई महापालिका अर्थसंकल्पाच्या सभा प्रत्यक्ष घ्या - भाजप गटनेते प्रभाकर शिंदे
‘होय, आम्ही आंदोलनजिवी असल्याचा आम्हाला अभिमान आहे', 'जय जवान, जय किसान’ आणि ‘गर्वसे कहो हम आंदोलनजिवी है', 'जय जवान, जय किसान', असे दोन ट्विट संजय राऊत यांनी केले आहेत. काही दिवसांपूर्वी राऊत यांनी दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला भेट दिली होती. येथे त्यांनी शेतकरी नेते राकेश टिकैत यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान राकेश टिकैत यांच्याबरोबर काढलेला फोटो देखील राऊत यांनी ट्विटला जोडला आहे.
आंदोलनजिवी परजिवी आहेत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी कृषी कायद्यावर आपली भूमिका व्यक्त केली. काही बुद्धिजिवी असतात, काही श्रमजिवी असतात, परंतु मागच्या काही काळात आंदोलनजिवी पाहायला मिळत आहेत. देशात कुठेही काहीही झाले, तर हे आंदोलनजिवी सर्वात आधी तिथे असतात. कधी पडद्याच्या मागे असतात, तर पडद्या पुढे असतात. अशा लोकांना ओळखून आपल्याला त्यांच्यापासून सावध राहिले पाहिजे. हे लोक स्वत: आंदोलन करत नाहीत. त्यांची ती क्षमताही नाही. मात्र, एखादे आंदोलन सुरू असेल, तर हे लोक तिथे पोहोचतात. हे आंदोलनजिवी परजिवी आहेत. ते प्रत्येक ठिकाणी मिळतात, असे मोदी यांनी सांगितले होते.
हेही वाचा - भारतरत्नांची चौकशी करणारे असे ‘रत्न’ देशात कुठेही सापडणार नाहीत