मुंबई Year Ender 2023 : मायानगरी मुंबईत ड्रग्ज तस्करीच्या अनेक घटना मागील वर्षभरात घडल्या आहेत. मुंबई पोलिसांनी वर्षभरात ड्रग्ज विरोधात मोठी कारवाई करत पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळालेल्या ड्रग्ज माफिया ललित पाटीलच्या कर्नाटक इथून मुसक्या आवळल्या. त्याचप्रमाणं मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं देखील कोविड काळात झालेल्या घोटाळ्यात तपासाचा वेग वाढवला. 2023 मध्ये मुंबईत गुन्हेविषयक घडलेल्या महत्वाच्या घटनांचा घेतलेला हा आढावा.
देवेन भारती यांची विशेष पोलीस आयुक्तपदी नियुक्ती : महाराष्ट्राच्या गृह विभागानं 1994 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची मुंबई पोलीस दलात विशेष आयुक्तपदी नियुक्ती केली. राज्य सरकारनं प्रथमच विशेष मुंबई पोलीस आयुक्तपद निर्माण केलं आहे. वरिष्ठ आयपीएस अधिकारी, देवेन भारती यांना यापूर्वी मुंबई पोलीस, कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या सहपोलीस आयुक्तपदी तसेच गुन्हे शाखेच्या अतिरिक्त पोलीस आयुक्त पदावर नियुक्त करण्यात आलं होतं. त्याचप्रमाणं यापूर्वी ते महाराष्ट्र एटीएसचे प्रमुखही होते.
धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी : मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये धमकीचा कॉल आला आणि एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी बीकेसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीला अटक करण्यात आली. त्याचप्रमाणं वर्षभरात मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला देखील अनेक धमकीचे फोन आणि मेल प्राप्त झाले होते. हे धमकीचं सत्र सुरूच आहे.
धारावीतून 28 लाखांचं ड्रग्ज जप्त : मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी कक्ष, वरळी युनिटनं धारावी परिसरातून तीन ड्रग्ज तस्करांना अटक केली होती. तसेच या तीन आरोपींकडून 140 ग्रॅम एमडी (मेफेड्रॉन ) हा 28 लाख रुपयांचा अमली पदार्थ जप्त केला. तिघांविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचप्रमाणं कस्टम अधिकार्यांनी दीड कोटी रुपयांचं विदेशी चलन जप्त करत एकास अटक अटक करण्यात आली होती.
कोरोना काळात झालेल्या घोटाळ्यात तपासाचा वेग वाढवला : कोरोना काळात मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाल्याची तक्रार सातत्यानं विरोधी पक्षाकडून केली जात होती. कोरोना काळात मुंबई पालिकेत वैद्यकीय उपकरण खरेदीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. लाईफ लाईन मॅनेजमेंट प्रकरणातील हे प्रकरण असो की ऑक्सिजन प्लांट घोटाळा, रेमडेसिवीर इंजेक्शन घोटाळा आणि खिचडी घोटाळा याबाबत किरीट सोमय्या यांनी तक्रार केली होती. फेब्रुवारी 2022 मध्ये खासदार संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळीकतेचा वापर करुन अस्तित्वात नसलेल्या संजय पाटकर यांच्या कंपनीला जम्बो कोव्हीड सेंटर चालविण्यासाठी करार केला होता. त्याचप्रमाणे माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह ठाकरे गटाचे सुरज चव्हाण, अमोल कीर्तिकर, रवींद्र वायकर यांच्यासह महापालिकेच्या अधिकाऱ्यांना देखील चौकशीच्या फेऱ्यात यावं लागलं होतं.
चित्रा वाघ आणि उर्फी जावेदमध्ये रंगला वाद : सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद आणि भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्यात वाद झाला होता. उर्फी जावेदच्या तोकड्या कपड्यांवर चित्रा वाघ यांनी आक्षेप घेतला होता. याप्रकरणी उर्फी जावेदवर कारवाई करावी, अशी मागणी मुंबई पोलिसांकडं चित्रा वाघ यांनी केली होती. तसेच, उर्फी समोर आली तर थोबडवणार, असं वक्तव्य भाजपा महिला प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ यांनी केलं होतं. यानंतर उर्फी जावेदनंही चित्रा वाघ यांच्याविरोधात मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
डॉक्टर सदिच्छा साने बेपत्ता प्रकरण गाजलं : पालघर इथं राहणारी आणि जे. जे. रुग्णालयातील डॉ. सदिच्छा साने बेपत्ता प्रकरणी सुमारे वर्षभरानंतर पोलिसांनी जीवरक्षक मिथ्थु सिंग (वय 32) याला अटक केल्यानंतर आणखी एकाला अटक केली. अब्दुल जब्बार अन्सारी असं या आरोपीचे नाव असून तो सदिच्छा साने ज्या रात्री गायब झाली त्या रात्री मिथ्थु सिंग याच्या संपर्कात होता. सदिच्छा अद्याप बेपत्ताच असून तिच्या शोधात मुंबई पोलीस दिल्ली आणि उत्तर प्रदेशला जाऊन ही अटकेची कारवाई केली होती. 29 नोव्हेंबर 2021 ला ती परीक्षेसाठी जाते म्हणून घरातून निघाली ती परतलीच नाही. सदिच्छा हिचा शोध कुठेच लागत नसल्यानं तिच्या कुटुंबियांनी बोईसर पोलीस ठाण्यात तक्रार केली. जे जे मध्ये परीक्षेस जाते म्हणून ती घराबाहेर पडल्यानं जे. जे. मार्ग पोलिसांनी देखील तिचा शोध घेतला. तिचा काहीच ठावठिकाणा लागत नसल्यानं या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडं सोपविण्यात आला होता. गुन्हे शाखेच्या कक्ष 9 नं याबाबत गुन्हा दाखल करून तपास सुरू करून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करतानाच पोलिसांनी 100 पेक्षा अधिक जणांची चौकशी देखील केली.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम वर्षभर राहिला चर्चेत : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमबाबत अनेक खुलासे होताना दिसत आहेत. दाऊदचा भाचा म्हणजेच हसीन पारकरचा मुलगा अलिशाह पारकरच्या एनआयएकडून झालेल्या चौकशीतून दाऊदच्या दुसऱ्या निकाहसह त्यानं पत्ता बदलल्यापर्यंतच्या अनेक गोष्टींचा खुलासा झाला आहे. त्याचप्रमाणं दाऊदला पाकिस्तानातील कराचीमध्ये हॉस्पिटलमध्ये विषबाधा झाल्यानं दाखल करण्यात आल्याची चर्चा देखील वाऱ्यासारखी पसरली होती.
मंत्रालयात चाकू घेऊन घुसला तरुण : मंत्रालयात चाकू घेऊन जाताना ज्ञानेश्वर सूर्यवंशी या तरुणाला अटक करण्यात आली होती. नवीन प्रशासकीय इमारतीच्या सुरक्षा गेटवर हा प्रकार समोर आला होता. याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मुंबई पोलीस दलात प्रथमच तृतीयपंथी उमेदवार : मुंबई पोलीस दलातील 8 हजार 70 पदांसाठी पोलीस भरती घेण्यात आली आहे. या भरतीसाठी जवळपास 7 लाख उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी केवळ 24 जणांचे अर्ज हे ट्रांसजेंडर कॅटेगरीतील असल्याची माहिती पोलीस दलातील सूत्रांनी दिली होती.
ड्रग्ज कारखाने उद्ध्वस्त : मुंबई पोलिसांनी सोलापूर इथं ड्रग्ज फॅक्टरीचा पर्दाफाश केला. त्याचप्रमाणं नाशिक येथील एमडी ड्रग्ज बनवणारा कारखाना उद्ध्वस्त केला आहे. या कारखान्यांमधून करोडो रुपयांचं ड्रग्ज आणि कच्चामाल जप्त करण्यात आला असून अनेकांना अटक देखील करण्यात आली. या कारवाईत विशेष करून ड्रग्ज माफिया ललित पाटील याला अटक करण्यात मुंबई पोलिसांना मोठं यश आलं.
दया नायक यांची मुंबई पोलीस दलात वापसी : चकमक फेम अशी ख्याती असलेल्या पोलीस अधिकारी दया नायक यांची महाराष्ट्र दहशतवाद विरोध पथकातून मुंबई पोलीस दलात बदली करण्यात आली आहे. दया नायक यांनी जवळपास 80 गुंडांचा एन्काउंटर केला.
महादेव अॅप प्रकरण आले मुंबई पोलिसांकडं : माटुंगा पोलिसांनी महादेव अॅप प्रकरणात प्रथमच गुन्हा दाखल केला. महादेव अॅप सट्टेबाजी घोटाळ्यातील आणखी काही कंगोरे समोर येऊ लागले आहेत. देशातील टॉप ब्रँड असलेल्या डाबरच्या कुटुंबातील सदस्यांचा 15 हजार कोटींच्या घोटाळ्यात सहभाग असल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणाचा आता मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा तपास करत असून सायबर सेलची एस आय टी या प्रकरणात चौकशी करणार आहे. अभिनेता साहिल खान याचं देखील आरोपी म्हणून या गुन्ह्यात नाव नोंद करण्यात आलं आहे. साहिल खाननं अटक टाळण्यासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. मात्र त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला. गुन्हे शाखेनं अभिनेता साहिल खान याला समन्स पाठवून तो हजर राहिला नाही.
हेही वाचा :