मुंबई - जगभरात कर्करोगाच्या संदर्भात अनेक विकसित देशांमध्ये अनेक प्रकारचे संशोधन केले जाते. आपल्याकडे याविरुद्ध परिस्थिती आहे. अजूनही आपल्या देशात केवळ उपचारच केला जातो. त्यामुळे येत्या काळात देशात कर्करोगावर मात करण्यासाठी नव नवीन संशोधन करण्याची गरज असल्याचे मत कर्करोग तज्ज्ञ डॉ. दिलीप निकम यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केले.
जगभरातील कर्करोगाच्या उपचारात संदर्भात ते म्हणाले की, आज जगभरामध्ये कर्करोगाचे उपचार करण्यासाठी ठराविक अशा गाईडलाईन देण्यात आलेल्या आहेत आणि त्या गाईडलाईन प्रमाणेच उपचार केले जातात. परंतु, यामध्ये सर्वात महत्त्वाची असे की, उपचार करताना त्यासाठीच्या पायाभूत सुविधा त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती आणि इतर विविध प्रकारच्या सोयीसुविधा यांचा फार मोठा फरक विकसित देशात आणि आपल्याकडे जाणवतो.
आपल्या देशातील रुग्णांची संख्या लक्षात घेतली, तर त्या मानाने आपल्याकडे कर्करोगासाठी लागणाऱ्या सोयीसुविधा उपलब्ध होत नाहीत. त्यातच कर्करोगासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा प्रचंड मोठा अभाव आहे. त्यामुळे एकीकडे रुग्णांचे प्रमाण जास्त आणि तज्ज्ञांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे जे तज्ज्ञ आहेत त्यांना 1 दिवसात अनेक रुग्णांवर उपचार करावा लागतो. त्यामुळे युरोपीय देशात आणि आपल्याकडे प्रमुख फरक म्हणजे आपल्याकडे केवळ उपचारावर लक्ष दिले जाते आणि विकसित देशात मात्र कर्करोग अधिकाधिक लवकर बरा होण्यासाठी विविध प्रकारचे संशोधन केले जाते. त्यासाठीची परिस्थिती निर्माण होण्यासाठी अनेक प्रकारच्या धोरणांची गरज असल्याचे मत डॉ. निकम यांनी व्यक्त केले
भारतातील सद्यस्थिती पाहिली तर कर्करोगामुळे आपल्या देशात लाखो लोक मृत्यूमुखी पडतात. हल्लीचे आकडे पाहिले तर इंटरनॅशनल एजन्सी फोर रिसर्च ऑन कॅन्सर या आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थेने केलेल्या अहवालानुसार जगभरामध्ये कर्करोगामुळे प्रत्येक वर्षी 1 कोटी 80 लाख रुग्ण बाधित होतात. त्यापैकी 96 लाख लोक मृत्यूमुखी पडतात. भारतात दरवर्षी 12 लाख नवीन रुग्णांची भर पडते. यापैकी सुमारे 7 ते 8 लाख लोकांचा मृत्यू होतो, अशी माहिती डॉ.निकम यांनी दिली.
कर्करोगाची प्रमुख कारणे तंबाखू आणि कुठल्याही प्रकारचे तंबाखूचे सेवन त्यासोबत दारू पिणे, लठ्ठपणा, अस्वच्छ पाणी, विविध प्रकारच्या घातक रसायनाची फवारणी केलेली फळे, भाज्या, ठरत आहेत. आज अनेक प्रकारचे बाजारात असलेले जंक फूड यामुळेही कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे.
जॉन हाफकिन या संस्थेने देशातील काही शाळांमध्ये 9 ते 14 वर्षांच्या काही मुलांची तपासणी केली. त्यामध्ये असे आढळून आले की, 30 ते 35 टक्के मुले ही तंबाखू आणि इतर व्यसनाच्या आहारी गेली आहेत, ही फार भयावह गोष्ट आहे. याचे सर्वात मोठे कारण मला असे वाटते की, पूर्वी एकत्र कुटुंबपद्धती होती आणि ती पद्धती नष्ट होत असल्याने असे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे मुलं व्यसनाच्या आहारी जातात आणि परिणामी कर्करोग सारख्या आजाराला भविष्यकाळात सामोरे जावे लागते. त्यामुळे पालक म्हणून आपण कमी पडतो. यामुळे शाळांमध्येसुद्धा त्यासाठीचे शिक्षण आणि जनजागृती करण्याची आवश्यकता वाटते, असे निकम यांनी सांगितले.