मुंबई - महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्याकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मुंबई पोलीस खात्यामध्ये ८ वर्षांहून अधिक काळ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक या पदावर काम करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांच्या तत्काळ बदल्या करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
७२७ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश -
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या इमारतीच्या काही अंतरावर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीत जिलेटिन कांड्या सापडल्या होत्या. यासंदर्भात मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचचे बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यास राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केली आहे. यादरम्यान महाराष्ट्र पोलिसांच्या एकंदरीत प्रतिमेला धक्का लागल्याची चर्चा पोलीस खात्यात सध्या सुरू होती. त्यामुळे मुंबई, नवी मुंबई व पुणे परिसरामध्ये आठ वर्षांहून अधिक काळ काम करणाऱ्या ७२७ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येत आहेत.
यापूर्वी झाल्या होत्या ८६ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या -
या अगोदर २४ मार्च रोजी ८६ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. ज्यामध्ये ६५ पोलीस अधिकारी असे होते. जे मुंबई पोलीस खात्यातील क्राईम ब्रांचमध्ये बरीच वर्षे काम करत आले होते. या 65 पोलीस अधिकाऱ्यांमध्ये 28 पोलीस निरीक्षक, 17 सहाय्यक पोलीस निरीक्षक व 20 पोलीस उपनिरीक्षक यांचा समावेश होता.