मुंबई : येत्या २७ फेब्रुवारीपासून मुंबई अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. या अधिवेशनाचा कार्यकाळ, कामकाजाचे स्वरूप कसे याचे नियोजन आखण्यासाठी राज्य विधिमंडळ कामकाज समितीची बैठक बोलावण्यात आली आहे. सकाळी १० वाजता विधानसभा आणि साडेदहा वाजता विधान परिषदेच्या कामकाजावर चर्चा होणार आहे. शिंदे सरकारचा पहिला अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्पाकडे राज्यातील जनतेला विशेष लक्ष आहे.
काँग्रेसमधील गटबाजी : राज्य विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीवर काँग्रेसकडून गटनेतेपदी बाळासाहेब थोरात यांची निवड केली आहे. नुकत्याच झालेल्या शिक्षक पदवीधर निवडणुकीत अंतर्गत गटबाजी उफाळून आली होती. त्यामुळे थोरात यांनी राजीनामा दिल्याचे सांगण्यात आले. काँग्रेसकडून या राजीनाम्याबाबत अद्याप स्पष्टीकरण आलेले नाही. मात्र बाळासाहेब थोरात हे प्रचंड नाराज आहेत. त्यामुळे थोरात या बैठकीला हजेरी लावणार का? हे पाहणे देखील महत्त्वाचे आहे.
सत्ताधारी आणि विरोधक सामना रंगण्याची चिन्हे : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरला डिसेंबर महिन्यात पार पडले. १९ डिसेंबर ते ३० डिसेंबरपर्यंत हे अधिवेश चालले. दोन आठवड्याच्या या अधिवेशनात विरोधक आक्रमक झाल्याचे दिसून आले. अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना निलंबित व्हावे लागला होत. आक्रमक विरोधकांना सत्ताधाऱ्यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले होते. अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सत्ताधारी आणि विरोधक असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत.
हिवाळी अधिवेशनात १२ विधेयक मंजूर : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेचे कामकाज ८४ तास १० मिनिटे चालले. हे दैनंदिन प्रमाण सरासरी ८ तास २५ मिनिटे इतके होते. १०६ लक्षवेधींवर अधिवेशनात चर्चा झाली. हिवाळी अधिवेशनात १२ विधेयके मंजूर करण्यात आली. अधिवेशनात आमदारांची सर्वाधिक उपस्थिती ९१.३२ टक्के, तर सर्वात कमी उपस्थिती ५०.५७ टक्के इतकी होती. एकूण उपस्थितीचे सरासरी प्रमाण ७९.८३ टक्के इतके होते. यापुढचे अधिवेशन मुंबईमध्ये सोमवार, २७ फेब्रुवारी २०२३ पासून सुरू होणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
अर्थसंकल्पीय कामकाजाचे वेळापत्रक : २७ फेब्रुवारीपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत होणार आहे. लवकरच कामकाज सल्लागार समितीत अर्थसंकल्पीय कामकाजाचे वेळापत्रक ठरणार आहे. महाराष्ट्रात आता अर्थसंकल्पाची तयारी सुरू झाली आहे. वार्षिक आराखड्यासाठी बैठका पार पडल्या आहेत. फडणवीस यांनी आतापर्यंत मुख्यमंत्री, गृहमंत्री, विरोधी पक्षनेता, उपमुख्यमंत्री अशी अनेक पदे भूषविली. अर्थमंत्री म्हणून हा पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहे.