मुंबई - शहरातील मुलुंड जकात नाका येथे रस्ते विकास महामंडळाच्या कामादरम्यान पालिकेच्या पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला हानी पोहचली होती. या जलवाहीनीच्या दुरूस्तीचे काम पालिकेने हाती घेतले होते. हे काम पालिकेने १५ तास आधी विक्रमी वेळेत पूर्ण केले आहे. नागरिकांनी या कालावधीत केलेल्या सहकार्यामुळे पालिकेने नागरिकांचे आभार मानले आहेत. दरम्यान येत्या ३१ मार्चपासून ठाणे येथील कामाच्या निमित्ताने ३० दिवस १५ टक्के पाणी कपात केली जाणार आहे.
जलवाहिनीला हानी - मुलुंड जकात नाका येथे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ द्वारे पर्जन्य जलवाहिनीसाठी बॉक्स कर्ल्व्हटचे काम सुरु होते. हे काम करण्यासाठी पालिकेने २७ मार्च ते २९ मार्च या दरम्यान १५ टक्के पाणीकपात जाहीर करण्यात आली होती. जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम दिवस रात्र सुरु होते. हे काम करण्यासाठी महापालिकेने विविध विभागाची पथके तयार केली होती. त्याची एकूणच आपत्कालीन विभागाची टीम तयार केली होती. त्यामध्ये १२ अभियंते, ३० कर्मचारी यांची या कामासाठी नियुक्ती करण्यात आली होती.
जलवाहिनीतून गळती झालेल्या पाण्यातच हे दुरूस्तीचे काम चालले. सलग ३६ तास काम करून आज सकाळी पहाटे ५ वाजता हे काम पूर्ण झाले. या कामासाठी 15 तास लागतील असा जल विभागाच्या इंजिनियर्सनी अंदाज केला होता. मात्र सुमारे १५ तास लवकर हे काम पूर्ण करण्यात आले. आज सकाळीच लवकर हे काम पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. पुढील ३० दिवस पाणीकपात - मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला ठाणे येथे खोदकाम करताना हानी पोहचली होती. या जलवाहिनीतून मुंबईला ६५ टक्के पाणी पुरवठा होतो. हा पाणी पुरवठा पर्यायी जलवाहिनीतून करून दुरुस्तीचे काम ३१ मार्चपासून सुरु केले जाणार आहे. या कामासाठी पुढील ३० दिवस मुंबईमध्ये १५ टक्के पाणी कपात लागू राहणार असल्याची माहिती पालिकेने दिली आहे.