मुंबई Women Safety In Rickshaws Issue : मुंबईत प्रवास करताना रिक्षामधील महिला सुरक्षेचा प्रश्न भेडसावत आहे. शेअर ऑटो रिक्षामधील सहप्रवाशांकडून महिलांना होणाऱ्या त्रासाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळं ऑटो रिक्षा टॅक्सीमन युनियनचे नेते शशांक राव यांनी पुढाकार घेतलाय. शेअर रिक्षामधील महिलांच्या सुरक्षेसाठी त्यांनी जनजागृती करण्यास सुरुवात केलीय. तसंच महत्त्वाचं म्हणजे शशांक राव हे दोन दिवसांत मुंबई पोलीस आयुक्त विवेक पंचाळकर यांची देखील या मुद्याच्या पार्श्वभूमीवर भेट घेणार आहेत. त्यांना महिलांच्या सुरक्षेबाबत पत्रक देखील देणार असल्याची माहिती ऑटो रिक्षा टॅक्सीमन युनियनचे नेते शशांक राव यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिलीय.
रिक्षामधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या तक्रारी : शशांक राव यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितलंय की, शेअर ऑटो रिक्षामधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या तक्रारींचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईत जवळपास दोन लाख ऑटो रिक्षा आहेत. त्यामुळं सुरुवातीपासूनच आम्ही ऑटो रिक्षा चालकांची भेट घेत आहोत. प्राथमिक स्तरावर महिलांच्या सुरक्षेबाबत जनजागृती करण्यास सुरुवात करण्यात आलीय. खासकरून तीन मुद्दे आम्ही प्रकर्षाने मांडले आहेत. पहिला मुद्दा म्हणजे शेअर ऑटो रिक्षामध्ये पुरुष सहप्रवाशाबरोबर महिला प्रवास करत असंल, त्यावेळी तिनं सहप्रवासी व्यक्तीनं तिला त्रास त्रास दिल्याची माहिती ऑटो रिक्षा चालकाला दिली. तर महिलेला त्रास देणाऱ्या सहप्रवाशाला रिक्षा थांबून उतरण्यास सांगावं. दुसरा मुद्दा रिक्षा चालकांना असा सांगण्यात आलाय की, एखाद्या महिला प्रवाशाला जर सहप्रवासी खूपच त्रास देत असेल, अन् तिला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करायची असंल तर रिक्षा चालकानं त्या महिलेला जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा पोलीस चौकीत नेण्यास मदत करावी. त्याचप्रमाणं तिसरा मुद्दा रिक्षाचालकांना हा सांगण्यात आलाय की, एका शेअर रिक्षात शक्यतो तीन महिला प्रवाशांनाच बसवा, जेणेकरून महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा उद्भवणार नाही.
महिला सुरक्षेबाबत जनजागृती : सुरुवातीला आम्ही ऑटो रिक्षा चालकांना हे तीन मुद्दे सांगून महिला सुरक्षेबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न केलाय. नंतर महिला प्रवाशांमध्ये देखील या संदर्भात जनजागृती केली जाणार असल्याची माहिती शशांक राव यांनी दिली आहे. त्याचप्रमाणं मुंबई पोलिसांची देखील मदत घेणार असल्याची माहिती राव यांनी दिलीय. महिलांच्या सुरक्षेच्या या कॅम्पीयनमध्ये पोलिसांचा सहभाग देखील महत्त्वाचा असल्यानं आम्ही दोन दिवसात मुंबई पोलीस आयुक्त विवेक पंचाळकर यांची भेट देऊन त्यांना पत्रक देखील देणार असल्याची माहिती शशांक राव यांनी दिलीय.
रिक्षामध्ये प्रवास करताना महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न : त्याचप्रमाणं आवाज फाउंडेशनच्या संस्थापक सुषमा मोर्या यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितलंय की, शेअर रिक्षामध्ये महिलांना वाईटरित्या स्पर्श करण्याचं प्रमाण वाढलंय. शशांक राव यांनी उचललेलं हे पाऊल अतिशय योग्य आहे. पुढे जाऊन महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उद्भवण्याआधीच उचललेलं हे कॅम्पेनिंगचं पाऊल अतिशय योग्य आहे. आमचा देखील यास पाठिंबा आहे.
हेही वाचा :