मुंबई - जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आज छत्रपती शिवाजी महाराज स्थानकावर रेल्वेच्या महिला कर्मचारी-अधिकारी यांनी संपूर्ण कामकाजाचा ताबा घेतला आहे. सकाळी ७ वाजतापासून स्थानकाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर महिला तिकिट तपासनीस आणि महिला आरपीएफ तसेच महिला राज्य पोलीसांनी कामकाज हातात घेतले आहे. यामुळे संपूर्ण स्थानक परिसरात महिला राज्य आल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
मुंबईतील विविध स्थानकात कार्यरत असलेल्या तब्बल ३० हून अधिक महिला तिकिट तपासनीस सीएसएमटी स्थानकात सकाळापासून तिकिट तपासनीचे काम करत आहेत. अचानक इतक्या मोठ्या प्रमाणात आलेल्या महिला तिकिट तपासणीस पाहून प्रवाशांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तर दुसरीकडे त्यांचे स्वागतही केले जात आहे. अनेकांनी आपल्याला आज महिला दिनाच्या शुभेच्छाही दिल्या, असे महिला तिकिट तपासनीस सिंधू राजेश राणे यांनी सांगितले.
आज सीएसएमटी स्थानकावर तिकिट तपासनीससोबत महिला आरपीएफ, होमगार्ड आदी महिला कर्मचारीही आहेत. केवळ स्थानकासमोरच १४ आरपीएफ महिला सकाळपासून आपली सेवा बजावत आहेत.
सकाळपासून महिला आणि पुरूष प्रवाशांकडून आमचे जोरदार स्वागत केले जात आहे. तसेच रोजच्या पेक्षा जलद गतीने आणि चांगले काम होत आहे, अशा प्रतिक्रिया प्रवासी आम्हाला देत असल्याचेही या महिलांनी सांगितले.