मुंबई - एका महिलेला प्रसव वेदना सुरु होत होत्या. मात्र तीला ताप असल्याने कोरोनाच्या भीतीमुळे पालिका किंवा खासगी रुग्णालये तिला दाखल करून घेण्यास नकार देतात. त्याचवेळी एक क्लिनिक चालवणारा डॉक्टर मदतीला धावत येतो आणि त्या महिलेची प्रसूती घरातच करतो. एखाद्या चित्रपटामधील हा प्रसंग वाटत असला तरी असाच प्रसंग देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील चांदीवली येथे घडला आहे. यामुळे वेळ प्रसंगी मदतीला धावून येणाऱ्या डॉ. रविंद्र म्हस्के यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.
मुंबईतील चांदीवली येथील संघर्ष नगर भागात कोरोनाचे काही रुग्ण आहेत. याच विभागात 22 डी या इमारतीमध्ये पूजा दत्तात्रय भिसे ही महिला राहते. तिची प्रसूती जवळ आली होती. त्यामुळे तीला महापालिकेच्या मुक्ताबाई रुग्णालयात नेले असता ताप असल्याने तीला भरती करून घेण्यास नकार देण्यात आला. बाहेर सोसाट्याचा वारा, चक्रीवादळाची भीती असताना या महिलेला पालिकेच्या राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. त्याठिकाणी बेड नसल्याचे कारण देण्यात आले. आधी कोरोना टेस्ट करा मगच तरच बेड देऊ, असे सांगण्यात आले. प्रसूती जवळ आली असताना वेळ नसल्याने या महिलेला खासगी रुग्णालयात नेले असता 1 लाख 20 हजार रुपये खर्च होईल, असे सांगण्यात आले.
एकीकडे पालिका रुग्णालयात भरती केले जात नव्हते तर दुसरीकडे खासगी रुग्णालयात लाख भर बिल मागितले जात होते. इतके पैसे नसल्याने या महिलेला पुन्हा घरी आणण्यात आले. या महिले सोबत घडलेला प्रसंग आणि तिला प्रसवकळा सुरु असल्याची माहिती मिळताच याच विभागात दवाखाना चालवणारे डॉ. रविंद्र म्हस्के धावून आले. त्यांनी या महिलेची घरीच प्रसूती केली. यामुळे डॉ. रविंद्र म्हस्के यांच्या कामाचे सर्वत्र कौतूक केले जात आहे.
हेही वाचा - लोकलसेवा सुरू झाल्यास आम्हीही सेवा देऊ - मुंबई डबेवाला असोसिएशन