मुंबई - संपूर्ण देशात लॉकडाऊन आणि सर्वत्र संचारबंदी असतानाही मात्र याकडे काही नागरिक दुर्लक्ष करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईतल्या अनेक रस्त्यावर शुकशुकाट असून याचा फायदा काही समाजकंटक घेत टिक-टॉक व्हिडिओ बनवत समाजमाध्यमांवर टाकत आहेत. त्यांना परिस्थितीचे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.
मुंबईतील रस्त्यांवर टिक-टॉक व्हिडिओ बनवणाऱ्या महिलेला अटक केली आहे. या महिलेचे नाव रेहना फिरोज खान (48) असे आहे. या महिलेविरोधात मुंबई पोलिसांत तक्रार करण्यात आली होती. या व्हिडिओची व रस्त्याची मुंबई पोलिसांनी शहानिशा केली आहे. या महिलेविरोधात आरसीएफ पोलीस ठाण्यात राष्ट्रीय व्यवस्थापन कायदा तसेच महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना या कायद्याखाली गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली आहे.
देशावर कोरोना विषाणूचे महाभयंकर संकट घोंगावत आहे. केंद्र आणि राज्य सरकार विविध उपाययोजना शोधत आहेत. देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन आहे. सर्वत्र संचारबंदी असतानाही याकडे काही नागरिक दुर्लक्ष करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईतल्या अनेक रस्त्यांवर शुकशुकाट असून याचा फायदा काही समाजकंटक घेत आहेत.