मुंबई: 'व्हॅलेंटाईन डे' आला की सगळ्यांना प्रेमाची चाहुल लागते. व्हॅलेंटाईन डे या खास दिवशी जोडपे रोमँटिक भेटवस्तू आणि ग्रिटींग कार्ड देऊन आपले प्रेम व्यक्त करतात. व्हॅलेंटाईन डेसाठी भेटवस्तू पाठवण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीने 51 वर्षीय महिलेची फसवणूक केली आहे. या महिलेची सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आमिष दाखवून 3 लाख 68 हजार रूपयांची फसवणूक केली आहे.
काय आहे प्रकरण: खार पोलिसांच्या माहितीनुसार, विवाहित महिलेने गेल्या बुधवारी इंस्टाग्रामवर अॅलेक्स लोरेन्झो अशी ओळख देणाऱ्या पुरुषाशी मैत्री केली. त्या व्यक्तीने नंतर तिला सांगितले की, त्याने तिला व्हॅलेंटाईन डे गिफ्ट पाठवले आहे. ज्यासाठी पार्सल मिळाल्यानंतर तिला 750 युरो फी ( भारतीय चलनात 66 हजार 741 रूपये ) भरावी लागेल, अशी माहिती तक्रारदाराने पोलिसांना दिली. नंतर, तिला एका कुरिअर कंपनीकडून संदेश आला की पार्सलचे वजन मर्यादित वजनापेक्षा जास्त असल्याने, तिला 72,000 रुपये अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल.
महिलेला आला संशय : महिलेने अतिरिक्त शुल्क भरल्यानंतर कुरिअर कंपनीच्या प्रतिनिधींनी महिलेशी पुन्हा संपर्क साधला. कुरिअर कंपनीच्या प्रतिनिधींनी सांगितले की, तुमच्या पार्सलमध्ये युरोपियन चलनी नोटा सापडल्या आहेत आणि मनी लाँड्रिंगचा आरोप टाळण्यासाठी तुम्हाला 2,65,000 रुपये द्यावे लागतील. महिलेने मनी लॉंड्रिंगच्या आरोपाच्या भीतीखाली कुरिअर कंपनीच्या प्रतिनिधींनी सांगितलेले पैसे भरले. महिलेने अडीच लाखांच्यावर रक्कम भरून देखील त्या व्यक्तीने पाठवलेले पार्सल घेण्यासाठी महिलेला पुन्हा ९८ हजार रुपये भरण्यास सांगण्यात आले. यामुळे त्या महिलेला संबंधित प्रकरणात संशय आला.
पोलिसात तक्रार दाखल : जेव्हा त्या महिलेने पैसे देण्यास नकार दिला तेव्हा लोरेन्झोने तिला धमकी दिली. तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून तिच्या कुंटुंबियांपर्यंत हे फोटो पोहचविण्याचे धमकी दिली. त्यानंतर महिलेने खार पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, पोलिसांनी रविवारी दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली 420 (फसवणूक) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या तरतुदींनुसार एफआयआर नोंदवला. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले.