मुंबई - रविवारी रात्री संपलेल्या पहिल्या मल्लखांब विश्वचषकामध्ये भारतीय संघाचा विजय झाला आहे. ही २ दिवसीय विश्वचषक स्पर्धा मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये आयोजित करण्यात आली होती. यामध्ये स्पेन, जर्मनी, चेक प्रजासत्ताक, इटली, यूएसए, इराण, नॉर्वे, इंग्लंड, फ्रान्स, मलेशिया, सिंगापूर, जपान, व्हिएतनाम, बहरीन, आणि यजमान भारताने सहभाग घेतला होता.
भारतीय संघ सुरुवातीपासून शेवटपर्यंत अव्वल ठरला, असे विश्वचषक स्पर्धेतील माध्यम विभागाने एका पत्रकात म्हटले आहे. रविवारी, विदेशी खेळाडूंनी वैयक्तिक चॅम्पियनशिपसाठी लढा दिला. २४४.७३ गुणांसह भारतीय संघाने चॅम्पियनशिप जिंकली तर सिंगापूर ४४.४५ गुणांसह दुसऱ्या स्थानी, तर मलेशिया ३०.२२ गुणांसह तिसऱ्या स्थानावर राहिला.
या स्पर्धेत सहभागी होऊन आंनद वाटला. या खेळात यापुढे आम्ही भारतासारखा परफॉर्मन्स दाखवू, असे विदेशी सहभागी राष्ट्राच्या खेळाडूंनी सांगितले. या कार्यक्रमादरम्यान, जर्मन मल्लखांब संघाचे प्रशिक्षक रुथ अॅन्झेनबर्गर यांनी आपल्या देशाच्या प्राचीन भारतीय खेळांच्या कार्यशाळा व अभ्यासक्रमाविषयी 'ऑडिओ व्हिज्युअल प्रेझेंटेशन' सादर केले.