जयपूर (राजस्थान) - महाराष्ट्रातील काँग्रेसच्या आमदारांच्या जयपूरमधील राजकीय पर्यटनानंतर आता शिवसेनेचे आमदार जयपूरमध्ये पाठविण्याची शक्यता आहे. यासाठी शिवसेनेने जयपूरमधील 'ब्युना विस्ता' या पंचतारांकीत हॉटेलमधील ५० खोल्या आरक्षित केल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा राजस्थान महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्र बनले आहे.
हेही वाचा - Live : 'महा'राज्याचे सत्तानाट्य : उद्धव ठाकरेंनीच मुख्यमंत्री व्हावं, शिवसेना आमदारांची बैठकीत मागणी
राजस्थानमध्ये सध्या जयपूर हे राजकीय कैदखाना झाल्याची चर्चा आहे. कारण या अगोदर महाराष्ट्र काँग्रेसचे आमदार याठिकाणी राजकीय पर्यटनासाठी आले होते. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात आमदारांची फोडाफोडी होऊ नये, याची अशोक गहलोत यांनी योग्य ती जबाबदारी पार पाडली. महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या 'महाविकास' आघाडीचे सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून आता शिवसेनेने आपल्या आमदारांना जयपूरमध्ये पाठविण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
हेही वाचा - नाशिकमध्ये शिवसेनेचा शो 'फ्लॉप'; भाजपचे सतीश कुलकर्णींची महापौर
जयपूरमधील ज्या पंचतारांकीत हॉटेलमध्ये काँग्रेसचे आमदार ठेवण्यात आले होते. त्याच हॉटेल ब्यूना विस्तामध्ये शिवसेनेच्या नावाने ५० खोल्या आरक्षित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढा सुटत नाही, तोपर्यंत शिवसेनेच्या आमदारांना या ठिकाणी ठेवण्यात येणार असल्याचे समजते. राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. त्यामुळे सध्यस्थितीत राजस्थानपेक्षा दुसरी सुरक्षित जागा नाही, असे शिवसेनेला वाटत आहे. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा अशोक गहलोत यांच्या रणनीतीचा फायदा शिवसेना घेताना दिसत आहे.