मुंबई - गेले वर्षभर कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे नागरिकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. मुंबई महापालिकेचा महसूलही कमी झाला आहे. त्यातच मुंबईकरांवर पाणीपट्टीच्या दरवाढीचा बोजा पडणार आहे. मात्र ज्याप्रमाणे मालमत्ता करवाढीचा प्रस्ताव फेटाळला, त्याचप्रमाणे पाणी पट्टीत वाढ होऊ देणार नाही, अशी ग्वाही स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिली.
२४ रुपयांचे पाणी ४ रुपये २५ पैशात
मुंबईत दिड कोटींहून अधिक नागरिकांना मुंबई महापालिकेकडून सुविधा दिल्या जातात. या दिड कोटी नागरिकांना पालिका पाणी पुरवठा करते. यासाठी प्रति एक हजार लिटर मागे मुंबई महापालिका २४ रुपये खर्च करते. परंतु मुंबईकरांना ४ रुपये २५ पैशात घरपोच पाणी पुरवठा केला जातो. स्वच्छ व शुद्ध पाणी मुंबईकरांना देण्यासाठी येणारा खर्च अधिक आहे. त्यामुळे दर ५ वर्षांनी म्हणजे १६ जूनला पाणी पट्टीत ८ टक्यांनी वाढ करण्यात येते.
'पाणीपट्टीत वाढ होऊ देणार नाही'
'गेल्या वर्षभरापासून मुंबईकर कोरोनामुळे त्रस्त असून आर्थिक गणित बिघडले आहे. त्यामुळे मालमत्ता कर वाढीचा बोजा मुंबईकरांवर टाकू दिला नाही. मालमत्ता करवाढी पाठोपाठ पाणीपट्टी वाढीचाही प्रस्ताव प्रशासन लवकरच स्थायी समितीत मांडणार आहे. मुंबईत दरवर्षी आठ टक्के पाणीपट्टी वाढ केली जाते. गेल्या वर्षी करोनाच्या संकटामुळे ती करण्यात आलेली नाही. यंदाही पाणीपट्टीत वाढ होऊ देणार नाही', अशी भूमिका शिवसेनेने घेतल्याचे यशवंत जाधव यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा - महापौरांच्या कामाची घेतली "वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन"ने दखल