मुंबई - अनिल देशमुख यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली असून यावर लवकरच सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. जोपर्यंत ही सुनावणी होत नाही तोपर्यंत आम्हाला थोडी मुभा दिली जावी अशी विनंती आम्ही ईडीला केली आहे, अशी माहिती अनिल देशमुख यांचे वकील इंद्रपाल सिंग यांनी दिली. तसेच आम्ही ईडीला सहकार्य करत आहोत. मात्र, तरीही ईडी वारंवार समन्स पाठवत आहे, असे अनिल देशमुख यांच्या वकिलांनी म्हटले आहे. आम्ही सत्र न्यायालय किंवा उच्च न्यायालयात जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाने पाचवा समन्स बजावला आहे. आज (बुधवारी) सकाळी 11 वाजता त्यांना सक्तवसुली संचालनालय यांच्या कार्यालयात उपस्थित राहायचे होते. मात्र, ते आजही चौकशीसाठी हजर राहिले नाहीत. त्यांच्यावतीने वकील हजर राहिले. सचिन वाझे प्रकरणात मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली होती. यानंतर त्यांनी अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपये वसुलीचा आरोप केला होता. यानंतर ईडी याप्रकरणाचा तपास करत आहेत.
अनिल देशमुखांचे वकील काय म्हणाले?
आम्ही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मात्र, तिथे अनेक प्रकरण प्रलंबित आहेत. त्या प्रकरणाशी आमचे प्रकरण जोडले आहे. आमची याचिका सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. त्यामुळे जोपर्यंत आमची याचिका कोर्टात प्रलंबित आहे तोपर्यंत आम्हाला शक्य होणार नाही. अनिल देशमुख यांचे वय पाहता तसेच त्यांना काही व्याधी असल्याने आणि कोरोना संसर्ग असल्याने ऑनलाईन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रकरणासंदर्भात असलेली कागदपत्रे देण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली आहे. दरम्यान, याआधीही न्यायालयात सुनावणी सुरू असल्याने चौकशीला हजर झाले नाही, त्याची ही कारणे होती.
आतापर्यंत एकदाही हजर नाही -
आतापर्यंत ईडीने अनिल देशमुख यांना चार समन्स बजावले आहेत. मात्र, चारीही वेळा देशमुख प्रकृतीचे कारण देत ईडी कार्यालयात हजर राहिले नाहीत. मागच्या सोमवारी सुप्रीम कोर्टातुन देखील अनिल देशमुख यांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. संपूर्ण प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यामुळे ईडीसमोर हजर होऊ शकत नाही, असही कारण दिले जात होते.
ईडीने काय म्हटले?
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ईडीच्या अधिकाऱ्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की, सध्या अनिल देशमुख कुठे आहेत याची माहिती नाही. मात्र, अनिल देशमुख हे सध्या दिल्लीमध्ये असल्याचा दावा त्यांच्या वकीलांकडून केला जात आहे. ईडी कार्यालयात हजर राहायचे की नाही राहायचे याचा संपूर्ण निर्णय अनिल देशमुख घेणार असल्याचेही वकिलांकडून सांगण्यात येत आहे.
हेही वाचा - मंदाकिनी खडसेंना ईडीची दुसऱ्यांदा नोटीस; आज चौकशीला हजर राहण्याचे आदेश