मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कामगारांच्या अनुकंपा भरतीची १३४९ पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे येत्या 2 महिन्यात भरण्यात येतील अशी माहिती मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आल्याचे राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष मनहर झाला यांनी सांगितले.
मुंबई महानगरपालिकेत सफाई कामगारांच्या समस्यांबाबत बुधवारी राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाने आढावा बैठक घेतली. या बैठकीत आयोगाचे दिलीप हाथीबेड, महेंद्र प्रसाद, पूर्ण सिंग, मुंबई महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी, अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल, प्रवीण दराडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना, मुंबई महानगरपालिकेच्या सफाई विभागात ३० हजार कर्मचारी कार्यरत आहेत. या विभागात एकही पद रिक्त नसल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आल्याचे झाला यांनी सांगितले.
१४ हजार घरे 2 वर्षात -
मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कामगारांसाठी ६ हजार घरे आहेत. सफाई कामगारांसाठी येत्या 2 वर्षात ८ हजार घरे बांधण्यात येणार आहेत. त्यामुळे येत्या 2 वर्षात सफाई कामगारांसाठी एकूण १४ हजार घरे उपलब्ध करून दिली जातील असे पालिकेकडून सांगण्यात आल्याची माहिती झाला यांनी दिली. सफाई कामगारांना लवकरात लवकर घरे मिळावीत म्हणून पालिकेने 2 अतिरिक्त आयुक्तांची नियुक्ती केली असल्याचेही झाला यांनी सांगितले.
३० ऑगस्टला राज्याचा आढावा -
राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग वेळोवेळी महानगरपालिका, राज्य सरकारमधील सफाई कामगारांच्या प्रश्नांबाबत आढावा बैठक घेते. आता, मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कामगारांबाबतही आढावा घेतला जाईल. येत्या ३० ऑगस्टला महाराष्ट्र राज्यामधील सफाई कामगारांचा आढावा घेतला जाणार आहे. त्यात सर्व महानगरपालिका, नगरपालिका, परिषद आणि राज्य सरकारमधील सफाई कामगारांचा आढाव घेतला जाईल असे झाला म्हणाले.