मुंबई - बेस्ट कर्मचाऱ्यांच्या वेतन कराराबाबत कृती समितीने संपाचा इशारा दिला असताना सत्ताधारी शिवसेनेच्या युनियनने मात्र वेगळी भूमिका घेतली आहे. येत्या 2 दिवसात सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत वेतन करार केला जाईल. त्यासाठी पालिका आयुक्त आणि बेस्टचे महाव्यवस्थापक यांच्याशी बैठक झाल्याचे शिवसेनेचे आमदार आणि नेते अनिल परब यांनी सांगितले.
बेस्ट कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन सुरु केले. यातच शिवसेनेने सांगितल्याप्रमाणे वेतन करार झाला नाही तर संप करू असा इशाराही बेस्ट कामगार कृती समितीच्या शशांक राव यांनी दिला होता. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी शिवसेनेच्या अनिल परब यांनी महापौरांच्या उपस्थितीत पालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी तसेच बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान बेस्ट कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करून येत्या 2 ते 3 दिवसात वेतन करार लागू करावा अशी मागणी करण्यात आली.
याबाबत बोलताना, बेस्ट कामगारांच्या प्रलंबित प्रश्नासंदर्भात कामगार सेनेच्या माध्यमातून पालिका आयुक्त व बेस्ट महाव्यवस्थापक यांच्याशी चर्चा झाली. यात सेनेने सातवा वेतन आयोग लागू झाला पाहिजे. तसेच त्यांच्या मागण्या सातव्या वेतन आयोगाप्रमाणे मान्य कराव्यात अशी मागणी केली. गेली कित्तेक दिवस याबाबत चर्चा सुरु असून आज त्याचा महत्वाचा टप्पा पार पडला आहे. सहानुभूतीपूर्वक भूमिका घेऊन लवकरात लवकर अंतिम निर्णय होईल अशी भूमिका व्यवस्थापनाने घेतली असून तसे आश्वासन व्यवस्थापनाने दिले असल्याचे परब यांनी सांगितले.
येत्या 2-3 दिवसात आयुक्त बेस्टच्या जीएम बरोबर चर्चा करून अंतिम निर्णय होईल. बेस्टचे शुल्क कमी केल्याने सध्या प्रवासी वाढले आहे. अशा वेळी बेस्टचे नुकसान होऊ नये म्हणून शिवसनेच्या युनियनने महत्वाची भूमिका घेतली आहे. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या हिताचा निर्णय येत्या 2-3 दिवसात होईल. त्यासाठी उद्धव ठाकरे हे सुद्धा प्रयत्न करत आहेत. प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून शिवसेना प्रयत्नशील असल्याचे परब यांनी सांगितले. तसेच 2-3 दिवसात सातवा वेतन आयोग लागू झाला तर मग इतर संघटनांना संप करण्याची गरज नसेल असे परब यांनी सांगितले.