मुंबई- सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटकच्या राजीनामा दिलेल्या बंडखोर आमदारांना आज संध्याकाळी ६ वाजेपर्यंत विधानसभा अध्यक्षांपुढे हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे मुंबईत वास्तव्यास असलेले कर्नाटक सकारमधील फुटलेले आमदार दुपारी १ च्या दरम्यान कर्नाटकात परत जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
जेडीएस आणि काँग्रेसच्या ११ आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर खऱ्या राजकीय नाट्याला सुरुवात झाली होती. यातील १० आमदार मुंबईतील रेनिसन्स हॉटेलमध्ये राहण्यासाठी आले होते. त्यांना भेटण्यासाठी कर्नाटकमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डी. के शिवकुमार आले होते. त्यांच्याबरोबर काँग्रेसचे माजी मुंबई अध्यक्ष मिलिंद देवरा आणि आमदार नसीम खान हे देखील होते. मात्र, आमदारांनी त्यांना भेटण्यास नकार दिला. त्यानंतर हॉटेल परिसरात खूप गोंधळ झाला होता. यावेळी डी. के कुमार यांना ताब्यात घेण्यात आले होते. आता सर्वोच्च न्यायालयाने या आमदारांना कर्नाटकात परत जाण्याचे आदेश दिले आहेत. हे आमदार कर्नाटकात परतल्यानंतर तिथल्या राजकीय परिस्थितीला काय वळन येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.