मुंबई - 1 ऑक्टोबर 2017ला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली होती. आपल्या पक्षाने राज्यभरात सक्रीय व्हावे यासाठी राणे कुटुंबीयांकडून अनेक प्रयत्न केले गेले. मात्र, नाइलाजवस्त राणेंना आपला पक्ष भारतीय जनता पक्षात विलीन करावा लागला असल्याचे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची संपूर्ण राजकीय कारकीर्द पाहिली तर, तशी ती वादग्रस्त राहिली आहे. आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात नारायण राणे यांनी शिवसेनेतून केली. शिवसेनेचे शाखाप्रमुख ते राज्याचे मुख्यमंत्री आणि आता केंद्र सरकारमध्ये लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योगमंत्री म्हणून अशी त्यांची मोठी कारकीर्द आहे. आधी शिवसेना, नंतर काँग्रेस आणि आता भारतीय जनता पक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला. मात्र, हा प्रवास करत असताना त्यांनी चार वर्षाआधी म्हणजे 1 ऑक्टोबर 2017 रोजी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षदेखील स्थापन केला होता.
3 जुलै 2005ला शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करत त्यांनी काँग्रेसची हातमिळवणी केली. मात्र, काँग्रेससोबतही नारायण राणे यांचं काही फारसं पटलं नाही. मुख्यमंत्रीपदावरून काँग्रेसचे दिल्लीतील ज्येष्ठ नेत्यांसोबत नेहमीच नारायण राणे यांचे खटके उडत राहिले. या दरम्यानच त्यांची भारतीय जनता पक्षाला सोबत जवळीक वाढली. मात्र, यावेळी काँग्रेस सोडून थेट भाजपात न जाता आपला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन केला.
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना -
शिवसेना आणि काँग्रेससोबत झालेल्या काडीमोडानंतर आपल्या विचारांचा पक्ष असावा असं वाटत असलेल्या नारायण राणे यांनी 1 ऑक्टोबर 2017 रोजी पक्ष स्थापन करत असल्याची घोषणा केली. या पक्षाचे नाव त्यांनी "महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष" असं ठेवलं. आपल्या पक्षाच्या प्रचार आणि प्रसारासाठी नारायण राणे आणि त्यांची दोन मुले नितेश आणि निलेश राणे यांनी बरेच कष्ट घेतले. कोकण ते पश्चिम महाराष्ट्रात दौरे करून "महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष" वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आपला पक्ष वाढवण्यास राणे कुटुंबीयांना हवं तसं यश आलेलं पाहायला मिळालं नाही. यातच नारायण राणे आणि भारतीय जनता पक्ष यांची जवळीक वाढली होती. नारायण राणे यांना भारतीय जनता पक्षात घेऊन मोठी जबाबदारी दिली जाईल, अशा चर्चाही 2019 च्या विधानसभा निवडणुका आधी रंगल्या होत्या. मात्र, शिवसेनेसोबत असलेले नारायण राणे यांचे राजकीय वैरामुळे नारायण राणे यांचा भारतीय जनता पक्षाचा पक्ष प्रवेश लांबणीवर पडत होता.
हेही वाचा - महाविकास आघाडी सरकार आजन्म अमरपट्टा घेऊन आले नाही - देवेंद्र फडणवीस
शेवटी नारायण राणे यांना भारतीय जनता पक्षाने राज्यसभेवर भाजप पुरस्कृत खासदार म्हणून पाठवले. त्यानंतर सप्टेंबर 2019मध्ये नारायण राणे यांनी आपला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष हा भाजपात विलीन केला. त्यामुळे जेमतेम दोन वर्ष अशी कारकीर्द त्यांच्या या पक्षाची राहिली आहे. काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर भारतीय जनता पक्ष आपल्याला पक्षात आपला प्रवेश होईल, अशी आशा नारायण राणे यांना होती. मात्र, त्यावेळी राज्यात असलेले भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या युतीमुळे नारायण राणे यांना भारतीय जनता पक्षाने आपल्यापासून लांब ठेवलं होतं. त्यामुळे नारायण राणे यांना आपला वेगळा पक्ष थाटण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नव्हता. म्हणूनच राज्यात शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात उडालेल्या खटक्यांमुळे नारायण राणे यांना भाजपाच्या जवळ जाण्याची संधी मिळाली. तसेच राज्यभरात कोठेही महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे दखल घेतली जात नाही याची कल्पनादेखील नारायण राणे यांना आल्यानंतरच नारायण राणेंना आपला पक्ष भारतीय जनता पक्षात विलीन करावा लागला, असे मत राजकीय विश्लेषक अजय वैद्य यांनी व्यक्त केले आहे.